Stock Market: शेअर बाजारात का झाली नफेखोरी?; निर्देशांकांत ‘घट’

मुंबई – निर्देशांक आवश्‍यकतेपेक्षा जास्त वाढले असल्याची भावना शेअर बाजारात निर्माण झाली आहे. त्यातच जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात विक्री होऊन निर्देशांकांत बरीच घट नोंदली गेली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 549 अंकांनी म्हणजे 1.11 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 49,034 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 161 अंकांनी कमी होऊन 14,433 अंकावर बंद झाला.

इन्फोसिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, ओएनजीसी, एशियन पेंटस्‌, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. मात्र या पडत्याही एअरटेल, आयटीसी, बजाज ऑटो, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले.

रिलायन्स सिक्‍युरिटीज या कंपनीचे विश्‍लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसापासून शेअर बाजारात कलेक्‍शनची चर्चा चालु आहे. त्यामुळे आज झालेली घसरण अपेक्षेप्रमाणे आहे. कंपन्यांचे बाजार मूल्य आवश्‍यकतेपेक्षा जास्त असल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये आहे.

मात्र जागतिक भांडवल सुलभतेमुळे निर्देशांकात वाढ झालेली आहे. त्यामुळे दिर्घ पल्ल्याची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कंपन्यांच्या शेअरच्या योग्य मूल्यावर थांबले आहेत अस त्यांनी सांगितले. योग्य मूल्यांकनापर्यंत निर्देशांकात करेक्‍शन होण्याची शक्‍यता त्यांनी सूचित केली. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शेअर बाजाराचे निर्देशांक फुगले असल्याचे म्हटले होते.

इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांनी गेल्या आठवड्यात नफा वाढलेले ताळेबंद जाहीर करूनही या कंपन्यांच्या शेअरचे भाव ताळेबंद जाहीर झाल्यानंतर कोसळले. याबाबत विश्‍लेषकांनी सांगितले की, या दोन्ही कंपन्यांच्या शेअरच्या भावात अगोदरच 28 टक्‍क्‍यापर्यंत वाढ झाली होती. त्यामुळेच ताळेबंद जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा काढून घेणे योग्य समजले.

मात्र अजूनही इन्फोसिस कंपनीच्या शेअरचे भाव वाढण्यास वाव आहे असे एडेलवाईस सिक्‍युरिटी, आयसीआयसीआय डायरेक्‍ट रीसर्च, मोतीलाल ओसवाल, कोटक सेक्‍युरिटीज, जेएम फायनान्शियल या ब्रोकरेज कंपन्यांना वाटते. मात्र विप्रोच्या शेअरचे भाव वाढण्यास फारसा वाव नाही, असे सांगितले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.