पणजी – एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ने आज गोव्यात पणजीमध्ये नव्या रूपातील, नव्या ढंगातील ईएसजी मल्टिप्लेक्सच्या आणि त्यांच्या नव्या लोगोच्या अनावरणाची घोषणा केली. या जागतिक दर्जाच्या मल्टिप्लेक्सचे उद्घाटन गोव्याचे माननीय मुख्यमंत्री आणि ईएसजीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या ईएसजी मल्टिप्लेक्समध्ये अत्याधुनिक पद्धतीच्या चार स्क्रीन्स आहेत. शिवाय, रीक्लायनर सीट्ससह इतर आरामदायी बसण्याची व्यवस्था आणि डॉल्बी ऍटमॉस साऊंड सिस्टममुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचा दृश्य आणि श्राव्य अनुभव मिळेल. गोव्याच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी इथे कॅफे अनवाईंड आहे.
या कार्यक्रमाला पणजीचे आमदार अँटानिओ मॉंन्सारेट, पणजी पालिकेचे महापौर उदय मडकायकर, गोव्याचे प्रधान सचिव आयएएस परिमल राय, ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फाळ देसाई, ईएसजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयएएस अमित सतिजा आणि सीसीपी आयुक्त संजित रॉड्रिग्ज उपस्थित असतील.
यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री आणि ईएसजीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, नव्या ईएस लोगोचे अनावरण आणि नव्या स्वरुपातील ईएसजी मल्टिप्लेक्सच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिल्याचा मला आनंद वाटतो. दूरदृष्टी असणारे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी 2004 मध्ये ईएसजीची स्थापना केली. वर्ष 2004 मध्ये एका छोटेखानी महोत्सवाच्या रुपात सुरू झालेल्या या उपक्रम पाहता इफ्फीचे 51 वे सत्र गोव्यात आयोजित केले जाईल, याचा विचारही त्यावेळी कोणी केला नसेल.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) सक्रिय झाल्याने ईएसजी आणि गोव्याला एक सुस्थापित सिने उद्योग, फिल्म सिटी आणि फिल्म स्टुडिओची उत्तम संधी निर्माण झाली. 50 वर्षांचा हा महत्त्वाचा टप्पा साजरा करताना आपण आशियातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या सिने महोत्सवाचे, इफ्फीच्या 51 व्या पर्वाचे 16 जानेवारी 2021 रोजी उद्घाटन करत आहोत ज्यात अप्रितम सिनेमे असतील.