-माधुरी तळवलकर
सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय घरांमध्ये ज्या प्रकारे दिवस सुरू होतो, तसा “घर की मुर्गी’ या फिल्ममध्येही सुरू झालेला आहे. दूध घ्यायला ती बाहेर येते. तेवढ्यात दारावर भाजी येते. ती घेतली जाते. मग कुकरची शिट्टी. नाश्ता खायला सगळे टेबलाभोवती बसलेत. गृहिणीची धावपळ चालूच आहे. प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन त्याप्रमाणे ती एकेक पदार्थ नाश्त्याला करते आहे. कुरकुर करत सगळे नाश्ता चापतात.
तेवढ्यात सासू आवाज देते. ही घाईघाईने सासूसासऱ्यांचा नाश्ता, चहा त्यांना देऊन येते. मग मुलांना घेऊन शाळेची बस गाठणं. स्वयंपाक, डबा. नवऱ्याचे ऑफिसला जाताना काहीतरी विसरणे. ते त्याला शोधून नेऊन देणे… हुश्श! आपण बघूनच दमून जातो. खरं तर घरोघरच्या स्त्रिया हीच कामं, अनेक व्यवधानं सांभाळत, उरकत असतात आणि घरच्यांच्या मागण्या वाढतच असतात.
सासूच्या पायाला मालिश करत असताना तिला हवा तो चॅनेल ती लावून देण्याचा प्रयत्न करते पण लागत नाही म्हटल्यावर सासूला म्हणते, “दुसरा देऊ का लावून?’ सासू गंभीरपणे म्हणते, “नाही, नाही… मग मला त्या सीरिअलमधला खून कोणी केला ते कसं समजणार… !’ त्यानंतर हिचं ब्युटीपार्लर सुरू होतं. वेगवेगळे क्लायन्ट्स येत राहतात. त्यांना सांभाळणं. एकजण म्हणते, “खून कुणी केला ते कळलं का?’ सासूकडून ऐकलेली माहिती ती सून क्लायन्टला गंभीरपणे सांगते. संध्याकाळी पुन्हा वेगळ्या कामांची गर्दी. सासऱ्यांना त्यांच्याबरोबर चालून जरा चक्कर मारून आणणं. दुसऱ्या दिवशीची तयारी…! दुसऱ्या दिवशी पुन्हा हाच क्रम… कुकरची शिट्टी, नाश्ता. खालून नवऱ्याची हाक. आज तो खालूनच सांगतो की, त्याचे चार मित्र रात्री जेवायला यायचे आहेत. ही तेही करते. पगारात कसे भागवायचे वगैरे चर्चा चाललेली असताना एकजण म्हणतो, तरी तुझ्या बायकोचा हातभार आहे. तो टिंगलीच्या स्वरात म्हणतो, “हॉ, आयब्रोज करून घरखर्च चालतो का?’ हे ऐकल्यावर मात्र या गृहिणीच्या डोळ्यात पाणी येते. साक्षी तन्वरने ह्या गृहिणीची भूमिका अप्रतिम केली आहे.
तिच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो आणि ती नवऱ्याला म्हणते, मला बाहेर जायचंय. दूर. काही दिवसांसाठी. ही आपल्याबरोबरच येणार असे समजून नवरा म्हणतो, मला शक्य नाही. ती म्हणते, मलाच जायचंय. आयब्रोज करून मिळालेले पैसे मी खर्च करीन. पैसेही नकोत. घरातल्या लोकांनी हिला इतके गृहीत धरलेले असते की, त्यांना धक्काच बसतो. मग प्रत्येक गोष्टीत आपण तिच्यावर किती अवलंबून आहोत, हे एकेकाला आठवते आणि सगळे घाबरून जातात.
पुढे काय होते? ती खरेच जाते का? गेल्यावर तिकडे राहते का? घरातली मंडळी सगळे कसे काय मॅनेज करतात? त्यांना कळते का? की, अरे, घर की मुर्गी आपण दाल बराबर समजत होतो. घरखर्चासाठी लागणारा निम्मा पैसा तर ती स्वतःच्या कष्टाने वाचवते. हे पुढे येणारे प्रखर वास्तव कळण्यासाठी, “घर की मुर्गी’ ही फिल्म जरूर पाहा.