विशेष : कीर्ती लाभावी दशदिशा…

-डॉ. विश्‍वास मेहंदळे

मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी नुकताच आपला निरोप घेतला. त्यांच्या आठवणी सांगताहेत डॉ. विश्‍वास मेहंदळे…

“गारंबीचा बापू’ या नाटकात त्यावेळी राधा ही भूमिका करणारी अभिनेत्री आशालता वाबगावकर आणि बापू ही व्यक्‍तिरेखा रंगवणारे अभिनेते श्रीकांत मोघे या मंडळींचा खूप जवळून परिचय झाला. त्या काळात जवळून बघितलेल्या अभिनेत्री आशालता वाबगावकर आणि पुढं केवळ आशालता एवढ्याच नावाने ओळखल्या जाऊ लागलेल्या त्या अभिनेत्रीला केवळ मीच काय आपण कोणीच विसरू शकणार नाही. गौर वर्णाची, बांधेसूद, गोव्याच्या टिपिकल कोंकणी भाषेत बोलणारी पण मराठी रंगभूमीवर वावरताना अतिशय देखणी दिसणारी आशालता.

नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये भूमिका करणारी ही अभिनेत्री मुळातली तशी गोव्याची. कोंकणी आणि मराठी नाटकांमधून ती गोव्याच्या रंगभूमीवर वावरायची. अनेक वर्षे ती तशी वावरलीसुद्धा. परंतु “गोवा हिंदू असोसिएशन’ या नाटक कंपनीने वि. वा. शिरवाडकर यांचे “संगीत मत्स्यगंधा’ हे नाटक रंगभूमीवर आणलं आणि त्यातल्या नायिकेच्या भूमिकेमुळे आशालता ही अभिनेत्री रसिक प्रेक्षकांना ठाऊक झाली. 2 जुलै 1941 चा गोव्यामधला जन्म असणारी ही अभिनेत्री गेली सुमारे 40 वर्षे मराठी रसिकजनांना आपल्या अभिनयाने आणि गोड गळ्यातून निघणाऱ्या स्वरातून रिझवते आहे. उत्तम अभिनय आणि त्याच्या जोडीला सुरेख गाणं यांचा सुंदर संगम या अभिनेत्रीच्या व्यक्‍तिमत्त्वात सामावलेला. अतिशय गोड आणि मृदू स्वरात बोलणं हे आशाताईंच्या स्वभावाचे एक वैशिष्ट. गोव्याचा माणूस मुळातच गोड. त्यात आशाताई तर वागायला-बोलायला अतिशय गोड, कधी उंच आवाजात त्या बोलणारच नाहीत. हा, नाटकात काम करताना चढवावा लागेल तेवढाच त्यांचा उंच स्वर. बाकी वागता बोलताना अत्यंत संयमानं वागणं.

अगदी अलीकडे आमचे मित्र शिरीष चिटणीस यांच्या पुढाकारानं सातारा शहरात “शब्द महोत्सव’ साजरा करण्यात आला. आम्ही आयोजकांनी उद्‌घाटनासाठी आशाताईंना बोलवायचं ठरवलं. त्या आल्या. दोन दिवस त्यांनी साताऱ्यात मुक्‍काम केला. अतिशय उत्साहात त्या, “शब्द महोत्सवात’ वावरल्या. पत्रकारांशी त्यांनी छान गप्पा मारल्या. एक दोन गाणी सादर करून त्यांनी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली.
साठ-सत्तर-ऐंशीच्या ज्या दशकांत आशालताबाई रंगमंचावर शेकडो प्रयोग सादर करीत होत्या. त्या काळात नाटकांचं खूप

मोठमोठे दौरे निघायचे. या साऱ्या परिस्थितीवर मात करीत आशालता या कलावतीनं अभिनयाबरोबरच संगीताचेही धडे गिरवले आणि नाट्य संगीताच्या क्षेत्रात मोठा लौकिक प्राप्त केला. आधी कोंकणी नाटकात भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीनं मुंबईत येऊन “अभिजात’, “गोवा हिंदू’, “चंद्रलेखा’ अशा अनेक नाट्यसंस्थांच्या माध्यमातून रंगभूमीची सेवा केली. त्यांनी कधी अटी वगैरे घातल्याचं कानावर आलं नाही. आपलं काम अतिशय मनापासून आणि प्रामाणिकपणाने करीत राहणं हेच या कलावतीचं ब्रीद होतं.

“गारंबीचा बापू’ असो, “वाऱ्यावरची वरात’ असो संगीत नाटकाचा प्रयोग असो, नाटक मुंबईत असो की, तालुका पातळीवरच्या गावात असो, या कलावतीनं जीव लावून, काम करीत असल्याचंच प्रत्येक वेळी दिसलेले आहे. “गुंतता हृदय हे’, “महानंदा’, “मत्स्यगंधा’ अशा अनेक नाटकांत त्यांनी अभिनय केला. त्याचबरोबर मोहन वाघ, प्रभाकर पणशीकर, डॉ. काशिनाथ घाणेकर, श्रीकांत मोघे अशा त्या काळातल्या अनेक मान्यवर आणि नाट्य-चित्रपट कलावंत-निर्मात्यांबरोबर त्यांनी काम केलं. त्यांनी रंगभूमी तर गाजवलीच पण त्याचबरोबर चित्रपटाचा पडदाही गाजवत ठेवला.

“उंबरठा’, “नवरी मिळे नवऱ्याला’, “माहेरची साडी’, “वहिनीची माया’, “अग्निसाक्षी’, “धर्मसंकट’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. तर “अंकुश’, “कुली’, “शराबी’, “नमक हलाल’, “यादों की कसम”, “वो सात दिन’, “शौकिन’, “सौगंध’, “जंजीर’, “चलते चलते’, “बेटी नं. 1′ इत्यादी हिंदी चित्रपटांत त्यांनी चरित्र नायिका म्हणून ठसा उमटवणाऱ्या भूमिका केल्या.

दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत विश्‍व नाट्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातून सुमारे दोनशे रंगकर्मी या संमेलनासाठी हजर होते. त्यावेळी आशालतांनी सादर केलेले “वाऱ्यावरची वरात’ या नाटकातलं त्यांचं स्वगत खूप गाजलं होतं. त्या दोनशे कलाकारांमध्ये जे दहा-वीस कलाकार उठून दिसत होते त्यात आशालता यांचा क्रमांक बराच वरचा होता. त्यांचं व्यक्‍तिमत्त्व तसं आहे चार-चौघांत उठून दिसणारं. कुठंही भेटोत आणि किती का घाईत असोत, “कसा असा?’ असं कोंकणीत विचारून “बरं असा नां!’ असं म्हणणाऱ्या आशालता एक उत्तम माणूस म्हणून कायम लक्षात राहतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.