नागपूर – हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून सभागृहात मुद्दा पुन्हा एकदा नेते समोर आल्याचे पाहायला मिळाले. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये चालू असलेला कलगीतुरा चर्चेचा विषय ठरला आहे. आधी ‘करेक्ट कार्यक्रमा’संदर्भात अजित पवारांनी नागपुरात केलेल्या विधानावर बावनकुळेंनी खोचक शब्दांत टोला लगावला. त्यानंतर आता अजित पवारांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना बावनकुळेंना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या 2024 च्या निवडणुकीत पवार कुटुंबाचा बारामतीत करेक्ट कार्यक्रम करू असं म्हटलं होतं. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं. “बावनकुळे यांनी आमचा करेक्ट कार्यक्रम करू, असं सांगितलं तेव्हापासून मला झोप येत नाहीये. मला तर वाटतंय राजकारणातून संन्यास घेतलेला बरा!”, असं अजित पवार म्हणालेत.
अजित पवार पुढे म्हणाले. “अरे बापरे, मला तेव्हापासून झोपच येईना हो..हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने आव्हान देतोय, मी तर विचार करतोय राजकारणच सोडून द्यावं. राजकीय संन्यास घ्यावा. २०२४ मध्ये असा अपमान होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा. सांगा त्यांना” असं म्हणत त्यांनी प्रतिउत्तर दिले आहे.