पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काहीतरी’ या विषयावर बोलताना सध्याचे राजकारण,पुणे मेट्रो, सामान्यांच्या जीवनावर होणारे परिणाम मुंबईतील सध्याची स्थिती अशा विविध विषयांवर भाष्य केलं. भाषणानंतर काही मोजक्याच व्यक्तींना ठाकरेंना थेट सवाल विचारण्याची परवानगी देण्यात आली. “यावेळी एका पुणेकराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘तुमचे मुख्यमंत्री’ म्हणून केल्याने राज ठाकरेंनी थेट कपाळावर हात मारून घेतल्याचे पाहायला मिळाले.
प्रश्न विचारण्याची संधी मिळताच पहिल्यांदा त्या व्यक्तीने भोंग्याच्या आंदोलनाबाबत भाष्य केले. तुम्ही भोंग्याचा आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा लावून धरा अशी मागणी देखील यावेळी या व्यक्तीने केली. तसेच हा त्रास कायमचा तुम्हीच संपवू शकता,कारण सध्या तुमचे मुख्यमंत्री आहेत असं या पुणेकराने म्हणताच एकच हशा पिकला. राज ठाकरेंनी पुणेकराचे हे विधान ऐकताच अक्षरशः कपाळावर हात मारून घेतला.
त्यानंतर पुणेकर पुन्हा म्हणाले,तुमचे मुख्यमंत्री म्हणजे तुमच्या फेवरमधील मुख्यमंत्री आहेत. पुणेकराच्या या विधानामुळे संपूर्ण सभागृहात एकच लाफ्टर सुरु झाला होता. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मनसेने देखील जोरदार पक्षबांधणी सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे हे देखील सध्या विविध पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेताना दिसून येतात. पुण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात जाणत्या जणांनी राजकारणात यावे तरच महाराष्ट्राची सुसंस्कृती राजकीय ओळख पुन्हा प्रस्थापित होईल असं राज ठाकरे यावेळी म्हणाले होते.