बारामती : माथेफिरुने डोक्यात दगड घालत एका वृध्द व्यक्तीचा खून केल्याची घटना शहरातील कसबा भागात कऱ्हा नदीच्या पात्रात रविवारी (दि. १९) सायंकाळी ही घटना घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान सावळाराम जगताप (वय ७०, रा. संत सेना महाराज नगर,कसबा, बारामती) खून झालेल्या वृध्द व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी गणेश मारुती कुंभार (वय ३२) या माथेफिरुला ताब्यात घेतले आहे.
या घटनेची शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील अप्पासाहेब पवार मार्गावरुन कऱ्हा नदीच्या जुन्या पुलावरुन जगताप हे कसब्यातील मशिदीच्या बाजूकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या कुंभार याने त्यांना नदी पात्रात ढकलून देत तेथे पडलेला एक दगड उचलून जगताप यांच्या डोक्यात घातला. ही घटना परिसरातील काहिनी पाहताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत जगताप यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.