मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले तरी राज्यात सरकार स्थापण होण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. जनतेने युतीला स्पष्ट कौल दिल्यानंतरही सेना -भाजप यांच्यातील मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपदावरूनचा वाद संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान, यासर्व परिस्थितीचा आनंद नेटकरी घेताना दिसत आहे. कारण सत्ता स्थापणेवरून सुरु झालेल्या संघर्षावर सोशलमीडियावर अनेक मीम्स तयार करण्यात येत आहेत आणि नेटकरी त्यातून दोन्ही पक्षाला मार्मिक टीका करत आहेत.
अनिल कपूरने यावर्षीच्या जानेवारी महिन्यात नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी एका चित्रपटाबाबत चर्चा करतानाचा हा फोटो त्यांनी ट्वीट केला होता. हा जुना फोटो मीम्स तयार करणाऱ्यांनी शोधून काढला आहे.
अभिनेता अनिल कपूर ‘नायक’ सिनेमात 24 तासांसाठी मुख्यमंत्री झाला होता. त्याचा संदर्भ सद्यपरिस्थितीशी जोडत अनिल कपूर आणि नरेंद्र मोदी यांच्या फोटोखाली “महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री. उद्या होणार शपथविधी’ असं लिहून शेअर केलं आहे.
मध्यंतरी शिवसेनेकडून वाटाघाटीत जेही ठरतंय, ते भाजपकडून लिहून घेणार असं म्हटलं होतं. त्यावर सतीश आचार्य यांनी हे कार्टून रेखाटलं आहे. त्या कार्टूनमध्ये सरकारवर टीका केली होती तर अन्य एका मीममध्ये “सरकार नसलं तरी चालतंय”, असा टोमणा मारण्यात आला आहे. दोन्ही पक्षांवरील असे कार्टून्सही चांगलेच व्हायरल होत आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांच्या कविता सोशल मीडियावर चांगल्याच लोकप्रिय आहेत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात तेही सक्रिय असल्याने त्यांचं नाव वारंवार येत आहे.
एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “या सगळ्यात माझं नाव विनाकारण घेतलं जात आहे. निवडणुकीत माझ्या पक्षानं खूप जागा जिंकल्या नाहीत. तरीही मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तर, मी चांगलं काम करून दाखवेन.”
मराठीत गाजलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमाला 31 वर्षं पूर्ण झाली असली, तरी त्यातलं प्रत्येक पात्र आणि संवाद आजही तितकाच लोकप्रिय आहे. या सिनेमातल्या संवादांचा आधार अनेक मीम्समध्ये घेतला जातो. परंतु सध्याचा सत्तास्थापनेच्या तिढ्याला संवाद नाही तर सिनेमाच्या पोस्टरचा आधार घेतला आहे.
लांबलेला पाऊस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहूनच जाणार, त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री ठरवा, अशा आशयाचे विनोद फिरत आहेत.
दुसऱ्या एका फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह करत आहेत.
ह्रतिक रोशनच्या ‘सुपर 30’ चित्रपटातील एका सीनचा वापर करून उद्धव ठाकरे अमित शहा यांना ‘ही चिटींग आहे’, असं म्हणत असल्याचं फोटोमध्ये म्हटलंय.
काहींनी सॅक्रेड गेम्सचा हा मीम शेअर केला आहे.
त्याशिवाय दोन्ही पक्षांबाबतचे अनेक विनोद, चार ओळीतल्या वात्रटीका व्हायरल होत आहेत. त्यापैकी एकामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी विविध पर्याय सांगण्यात आलेले आहेत.