श्रीकांत कात्रे
छंद म्हणून अनेक जण काही कला जोपासत असतात. आवड असली तरीही त्यातून एखादा व्यवसाय यशस्वी करणारे फारच थोडे असतात. मेघना पुनदिकर यांनी आपल्या अंगभूत कलेचा उपयोग व्यवसायासाठी केला. केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करीत त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायाची उलाढाल आता लाखांच्या घरात तर गेली आहेच. त्याशिवाय या उद्योगातून त्यांनी आणखी काही महिलांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांनाही आर्थिक स्वावलंबी बनविले आहे…
आवड असली की सवड मिळते. माझ्याकडे असलेल्या कलेतूनच माझा व्यवसाय सुरू झाला आणि वेळोवेळी प्रगती होत व्यवसाय स्थिर झाला,फ वडूजच्या मेघना पुनदिकर सांगत होत्या. आता या व्यवसायातील उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून व्यवसायात विविध प्रकारच्या उत्पादनांची भर पडत असल्याने त्यांना वेळ पुरेनासा झाला आहे. शोपीस बनविण्याचा व्यवसाय त्यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केला.
त्यापूर्वी सात आठ वर्षे त्यांनी नोकरीही केली. पुढे पतीच्या ज्योतिषविषयक आणि वास्तू शास्त्रविषयक व्यवसायासंबंधी त्यांनी शिकून घेत त्याविषयीच्या परीक्षाही दिल्या. त्या कामात पतीला मदत करू लागल्या. त्याचवेळी त्यांच्या सोलापूरच्या एका मैत्रिणीने त्यांना एक वॉल पीस भेट दिला. तो वॉल पीस पाहिल्यावर आपणही अशा शोच्या वस्तू बनवू शकतो, असे त्यांना वाटले. त्यासाठी पाच हजार रुपयांची गुंतवणूक करीत त्यांनी कच्चा माल आणून कामाला सुरवात केली.
मेटल, ऍक्रेलिकपासून विविध प्रकारचे शो पीस, सजावट केलेल्या डीश, प्लेटस्, कलश, ताट, हळदी कुंकू डबी, वॉल होल्डर, लक्ष्मी पाऊल, विविध प्रकारची डिझाइनची तबके, कॅन्डल होल्डर, समई स्टॅंन्ड, नेमप्लेट, शुभ लाभ, स्वस्तिक, कोयरी, गौरी गणपती किंवा दिवाळीच्या वेळी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू त्या तयार करू लागल्या. व्हॉटसऍपच्या स्टेटसला या उत्पादनाची माहिती टाकली. त्यांच्या मैत्रिणींचे सर्कलही मोठे आहे. माऊथ पब्लिसिटीमुळे मागणी वाढत गेली. उत्पादनाची होलसेल विक्री सुरू झाली. खूपच वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांनी या कामासाठी सात महिलांची मदत घेतली.
त्यांनाही त्या रोजगार देऊ लागल्या. वडूजमधून पेडगावला जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजे गावाच्या बाहेरील बाजूस त्यांचे हे व्यवसायाचे ठिकाण आहे. माणदेशी फाउंडेशनने गावात स्टॉलमधून विक्री करण्याची संधी दिल्यामुळे प्रतिसाद वाढला. या वस्तू तयार करण्यासाठी त्यांना पुण्यातून कच्चा माल आणावा लागतो. गायत्री क्रिएशन्स या नावाने स्थानिक बाजारपेठेसह त्या पुणे, किर्लोस्करवाडी, कराड येथे होलसेलमध्ये उत्पादनाची विक्री करतात. व्यवसायाचे यश आता दिसत असले तरी त्यामागे मेघना यांचे कष्ट मोठे आहेत. सातत्याने काम करत राहण्याची चिकाटी मोठी आहे. घराची जबाबदारी सांभाळून रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत या वस्तू तयार करण्याचे काम सुरू राहते. लॉकडाऊनच्या काळात तर रात्री उशिरापर्यंत जागून या वस्तू त्यांनी तयार केल्या आहेत. या वस्तू तयार करण्याबरोबरच ज्योतिषशास्त्र व वास्तूशास्त्राबाबतही त्यांचे काम सुरू असते.
त्याखेरीज त्यांचे पती महेशशास्त्री पुणदिकर यांनी ज्योतिष आणि वास्तूशास्त्राच्या अनुषंगाने लागणाऱ्या पूजासाहित्याचे साचेही विकसित केले आहेत. अशा प्रकारचे उत्पादन तयार करणारे हे एकमेव उत्पादक असून त्याचे पेटंट घेण्यासाठीही मेघना यांचे प्रयत्न सुरू आहेत. या पूजा साहित्यामध्ये विविध प्रकारची यंत्रे, मंडल, चक्र, रूद्र, पत्र, गौरीतिलक, रुद्रमंडल, नवग्रह किंवा देवी मूर्ती, मातृका अशा पूजा करणाऱ्या गुरूजींना मांडणीसाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे. हा व्यवसाय नवीन आहे. या पूजांसाठी लागणारे हे साहित्य हाताने तयार करायला पूर्वी दोन ते तीन तास लागत. परंतु, यासाठी तयार केलेल्या साच्यांमुळे गुरूजींचे हे काम अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये होते, असे मेघना यांनी सांगितले. हे उत्पादन खूप सुंदर आणि युनिक आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक यांसह अमेरिका, मॉरिशस, दुबई येथेही हे उत्पादन पोहचले आहे, असे त्यांनी सांगितले. शो पीससह या सर्व उत्पादनांची डिझाइन स्वतः तयार करत असल्यामुळे या सर्व प्रकारच्या उत्पादनांचा दर्जा टिकविण्यात त्यांना यश मिळते.
मेघना यांच्या सासूबाईही खूप सक्रिय आहेत. त्यांच्यामुळे मेघना यांनी पूर्वी सर्व कला प्रशिक्षणाचा 15 दिवसांचा अभ्यासक्रम अमरावती येथे पूर्ण केला होता. माणदेशी फाउंडेशनकडून नेहमीच प्रोत्साहन मिळते. आता डीजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षणही माणदेशीकडून मिळणार असल्याचे त्या सांगतात. पाच हजार रुपयाच्या भांडवलावर सुरू केलेला या व्यवसायाची उलाढाल आता सहा ते सात लाखांवर पोहचली आहे. उत्पादनांची मागणी वाढती आहे. व्यवसाय वाढविण्यासाठी आणखी खूप प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडील कलेचा उपयोग करून ग्रामीण भागात असे वेगळे व्यवसाय करण्याचा दृष्टीकोन बाळगत स्वतःची प्रगती साधताना इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याचा मेघना यांचा प्रयत्न सर्वांसाठीच अनुकरणीय असाच आहे.