सातारा -शिवसैनिकाच्या न्यायासाठी गेल्या अडीच वर्षात एकही निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसबरोबर युती करून सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना खाऊन टाकली. शिवसेना पक्ष संपवण्यासाठीच या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कामे केली, अशी टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
येथील एका हॉटेलमध्ये आयोजित शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे, निलेश मोरे आदी उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, “”सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये सरकार स्थापनेवेळी दिला होता. त्यावेळी आम्हाला वाटले भाजप-शिवसेना युती होणार आहे.
मात्र, त्यानंतर दोन दिवसांत तो शब्द फिरला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसबरोबर युती करून सरकार स्थापन केले जाणार असे पक्षप्रमुखांनी सांगितले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांनी याला विरोध केला होता. कारण हे दोन्ही पक्ष शिवसेना खाऊन टाकतील आणि आपला पक्ष संपवतील हे आम्ही सांगितले होते. शिवभोजन केंद्र सुरु करण्याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी मांडली. अडीच वर्षात एकाही शिवसैनिकाला शिवभोजन केंद्र मिळाले नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी यादी दिली की मंजूर असा सर्व कारभार अडीच वर्षे सुरु होता. या अडीच वर्षात कोणताही निर्णय शिवसैनिकाला न्यायासाठी झाला नाही.” मातोश्रीवर आज ओपन प्रवेश आहेत. गेल्या अडीच वर्षात वेगळेच चित्र होते. मुख्यमंत्री दालनात कोविड होता अन शेजारी असणाऱ्या उपमुख्यमंत्री दालनात कोविड नव्हता असे चित्र दिसले. आता शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम करायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
खरे गद्दार तर तुम्ही ः महेश शिंदे
“आम्ही जनतेशी गद्दारी केली असे अनेक जण बोलत आहेत. आम्ही जनतेशी गद्दारी केली नाही. उलट तुम्ही जनतेशी गद्दार केली आहे. ठाकरे कुटुंबात दोन मंत्रिपदे असताना तुम्ही जनतेची सेवा न करता घरात बसलात. खरे गद्दार तुम्ही आहात, आम्ही नाही,’असे आमदार महेश शिंदे यांनी ठणकावून सांगितले. जिल्ह्यात शिवसेना व भाजपची ताकद वाढवण्यावर भर देणार आहे. काही जण तिकडे राहिलेले आहेत. उद्या ते आपल्याबरोबरच येणार आहेत. आगामी काळात पूर्ण ताकदीने काम करायचे आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना त्यांनी केल्या.