धनकवडी – धनकवडी येथे रस्त्यावर वापरलेल्या इंजेक्शनच्या सुया व सिरींज मोठ्या प्रमाणात पडले होते. नवरात्रामध्ये अनेक भाविक पायामध्ये चप्पल घालत नसल्याने या सिरींजची सुई पायामध्ये घुसून एक मुलगी जखमी झाल्याची घटना सह्याद्रीनगर येथे (रविवारी) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली. यावेळी वीजपुरवठा खंडीत झाला होता. परिसरातील काही खासगी रुग्णालय, पॅथोलॉजी लॅब यातून वैद्यकीय कचरा असा उघड्यावर टाकला जात असल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला आहे. संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत कडक नियम असताना तळजाई धनकवडीतील सह्याद्रीनगर रस्ता तसेच तळजाई पठारकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाही उघड्यावर असा कचरा टाकला जात आहे. महापलिकेने अधिकृत केलेल्या वाहनांद्वारेच शहरातील जैव वैद्यकीय कचरा जाम केला जातो. याबाबत रुग्णालये, लॅबोरेटरीज व इतर आरोग्य विषयक सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये याबाबत रजिस्टर उपलब्ध असते.
मात्र, गेल्या काही दिवसांत धनकवडी परिसरात असा कचरा उघड्यावर दिसू लागला आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने संबंधीतांचा शोध घ्यावा, तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पतीत पावन संघटनेचे अध्यक्ष विजय क्षिरसागर यांनी केली आहे.
मेडिकल जैव वैद्यकीय कचरा याबाबत कायदेशीर नियमावली आहे. धनकवडीतील प्रकार समजल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी आरोग्य निरीक्षक यांच्यामार्फत पाहणी करून चौकशी व तपास सुरू आहे. हा कचरा कोणी टाकला आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. – सुरेखा भणगे, सहायक आयुक्त, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय
धनकवडी परिसरातील सह्याद्रीनगर व तळजाई पठाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेल्या जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत परिसरातील सीसीटीव्ही व इतर माहितीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. लवकरच गुन्हा नोंदवून दोषींवर कारवाई करण्यात येईल. – विक्रम ताथवडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय