जाधववाडी – पिंपरी चिंचवड शहरातील बरेच बांधकाम व्यावसायिक नियमाचे उल्लंघन करत आहेत. नियमबाह्य बेधडक बांधकाम करत आहेत. त्याला पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन पाठीशी घालत आहे. याबाबत तीव्र स्वरूपाचा आवाज उठविण्याचे एकमत सोसायटीधारकांनी मांडले.
चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने सोसायटीधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन केले होते. या सभेला फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, कायदे विषयक सल्लागार अजित बोराडे, आदींसह परिसरातील 1 हजार 500 सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून सोसायटीधारकांची होणारी पिळवणूक तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून प्रलंबित कामाबाबत चर्चा करण्यात आली.
या सभेमध्ये फेडरेशनचे कायदेविषयक सल्लागार अजित बोराडे यांनी आदर्श उपविधीनुसार सोसायटी कशी चालवायची, याबद्दल मार्गदर्शन केले. सोसायटी विकसकाकडून हस्तांतरण करून घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणती कागदपत्रे घ्यावीत, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कन्व्हेन्स डीड, डीन्म्ड कन्व्हेन्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गणेश वाघमारे यांनी सोसायटीची पूर्ण निवडणूक प्रक्रिया सर्व सभासदांना समजावून सांगितली. या सभेमध्ये रवींद्र आंबेकर, मारुती परीट यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक निकम यांनी केले. आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले. फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी कार्याचा आढावा सादर केला.
पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्येपैकी 75 टक्के लोकसंख्या ही आज सोसायट्यांमध्ये राहते. त्यामुळे सर्व सोसायटीधारकांनी एकत्र येऊन आपले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आणि सर्व सोसायट्या आदर्श उपविधीनुसार चालविण्यासाठी फेडरेशनमार्फत भविष्यात काम केले जाईल. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये सर्व सोसायटीधारकांचे योगदान असेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून प्रशासनावर दबाव गट आणून सर्व काम करून घेण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.