मेडिकल, किराणा दुकानात गेल्यावर करोना होत नाही का?

पान टपरी तसेच सलुन चालकांनी मांडली कैफियत

पुणे – राज्य सरकारने कोणतीही चर्चा न करता तसेच छोट्या व्यावसायिकांना विश्‍वासात न घेता परस्पर निर्णय घेतले. मेडिकलच्या दुकानात औषधे घेण्यासाठी गेल्यावर किंवा अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली ज्या व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे, तीथे गेल्यावर करोना होत नाही का, केवळ पान टपरी किंवा सलुनमध्ये गेल्यावरच करोना होतो, असा उद्विग्न सवाल या छोट्या व्यावसायिकांनी केला आहे.

गेल्या वर्षी पहिल्यांदा जेव्हा करोनाचा धोका उत्पन्न झाला त्याचा फटका आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना बसलाच होता. त्यानंतर व्यावसाय पूर्वपदावर येऊ लागला होता. आता पुन्हा एकदा हा धोका वाढल्यामुळे आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांचे तर कंबरडेच मोडले आहे.

जगायचे कसे ते पण आता सरकारनेच सांगावे. बाजारात गर्दी होत म्हणून त्यासाठी काही उपाययोजना तयार करण्या ऐवजी थेट सगळा बाजारच बंद करायचा ही कोणती निती आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असाच हा प्रकार आहे, अशा शब्दात कोथरुड येथील एक पानाच्या दुकानाचे मालक राघव शेट्टी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

हॉटेलमध्ये, मेसमध्ये जे लोक पार्सल घेण्यासाठी जात आहेत त्यांना करोनाचा धोका होणार नाही का. ज्या व्यवसायांना सरकारने परवानगी दिली आहे तीथे करोना होत नाही आणि आमच्यासारख्या व्यापाऱ्यांच्या दुकानात गेल्यावरच करोना होतो हा जावईशोध सरकारने कसा काय लावला. गेले जवळपास 10 महिने आम्ही रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करत आहोत. 

सरकारी कार्यालये तसेच खासगी कार्यालयात पन्नास टक्के उपस्थितीचे बंधन घातले म्हणजे तीथे कोणालाही करोनाची बाधा होणार नाही याची खात्री सरकार देणार का. आधी नोटाबंदीने त्रस्त केले आता करोनामुळे. कारणे काहीही असो तोटा आमचाच झाला आहे. त्यात सर्वसामान्य जनताही त्रस्त झाली आहे. केवळ काहीतरी करत असल्याचे चित्र निर्माण करुन छोट्या व्यावसायिकांना देशोधडीला लावण्याचाच हा उद्योग आहे, असे ताशेरे बाबा रसाळ या व्यावसायिकाने मारले आहेत.

इमारतींच्या बांधकामाला परवानगी दिली गेली, मग तीथे काम करत असलेल्या मजुरांना हा धोका नाही होणार का. शहरात मुख्य रस्त्यांवरची दुकाने बंद दिसतात मात्र, गल्ली बोळातील अनेक दुकानांत राजरोसपणे वस्तूंची विक्री केली जात आहे. त्याकडे सरकारचे पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही. मुळात प्रशासनाला व पोलीसांना तरी कोणत्या गोष्टींवर बंदी आहे हे तरी पूर्ण समजलेले आहे का, असा सवालही शेट्टी यांनी केला.

जर सरकारला खरोखरच करोनापासून नागरिकांना सुरक्षीत ठेवायचे असेल तर, त्यांच्याकडे अन्य कोणताही मार्गच नाही का. लसीकरण सुरु आहे, त्यात वाढ करणे. सर्व दुकानांना वेळेच बंधन घालणे. केवळ कापड दुकाने किंवा तत्सम दुकांनावर बंदी आणून हा प्रश्‍न सुटणार आहे अशी शासनाची समजूत आहे का. लोकांमध्ये संताप आहे. अनेक जण करोनाबाबतच्या नियमांचे पालनही करत आहेत. आता काही लोक हे पाळत नाहीत आणि त्याचा फटका मात्र, सगळ्यांनाच बसत आहे. एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेणे सोपे आहे, प्रत्यक्ष वाड्या वस्त्यांवर जाऊन पाहिले तर तेथे रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करत असलेले नागरिक दिसून येतील. शासनाच्या संवेदना क्षिण होत असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे, असेही ते म्हणाले.

वस्तूस्थिती सरकार सांगेल का
एकदा सांगितले जाते संध्याकाळी आठ ते सकाळी सात सगळे बंद राहील. मग सांगितले जाते की मिनि लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू राहतील. खरेच काय बंद राहील व काय सुरु राहील हे शासनाला तरी निश्‍चितपणे समजलेले आहे का. सार्वजनिक वाहतूक बंद करुन काय साध्य होणार आहे. प्रवासी संख्येवर बंधन घालून सर्वकाही सुरळीत चालू राहण्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत. बॅंका तसेच अन्य अस्थापना सुरू आहेत पण तीथे करोनाचा धोका नाही असा सरकारचा समज आहे का. सर्वसामान्य माणसांसाठी कोणी याकडे लक्ष देईल का, असा सवालही या व्यावसायिकांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.