भिवंडी: सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता तिचा अंदाज बंधने भल्या भल्याना शक्य नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण ८० नगरसेवकांचे संख्याबळ असणाऱ्या भिवंडी महापालिकेत ४ नगरसेवक असलेल्या पक्षाचा महापौर झाला आहे. काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी केलेल्या बंडखोरीमुळे एक हाती असणारी सत्ता काँग्रेसला गमवावी लागली आहे.
भाजपा आणि बंडखोर काँग्रेसच्या मदतीने महापौरपदी अवघे चार नगरसेवक असणाऱ्या कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. ४७ नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसची भिवंडी महापालिकेत एकहाती सत्ता होती. मोदी लाट असतानाही भिवंडीत मात्र काँग्रेसने सत्ता राखण्यात यश मिळवलं होतं. परंतु बंडखोरीमुळे मोठा राजकीय भूकंप झालाआहे.
दरम्यन महापौरपदाच्या निवडणुकीत महापौरपदासाठी काँग्रेसच्या रिषिका राका, कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील, तर शिवसेनेच्या वंदना मनोज काटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसने रिषिका राका यांना मतदान करण्यासाठी नगरसेवकांना व्हीपदेखील जारी केला होता. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांचा विजय झाला आहे.
प्रतिभा पाटिल यांना एकूण ४९ मतं मिळाली तर विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या रिषिका राका यांना ४१ मतं मिळाली. काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
महापालिकेतील पक्षीय बलाबल काँग्रेस – ४७ शिवसेना – १२ भाजप – २० कोणार्क विकास आघाडी – ४ समाजवादी पार्टी – २ आरपीआय (एकतावादी)- ४ अपक्ष – १