मुंबई – भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे सरकार, महापालिका विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यासंदर्भातील माहिती सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शिवसेनेवर आरोप करत किरीट सोमैय्या म्हणाले कि, करोनाच्या पार्श्वभूमीवर १२ हजार कोटी रुपये खर्चून मुंबईत पाच हजार खाटांचे कोविड हॉस्पिटल बांधले. यामध्ये ३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणाचा तपास लोकायुक्तांनी करावा, असे निर्देशही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत, अशी माहितीही सोमैय्या यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घोटाळ्याबाबत महापौरांना जाब का विचारला नाही, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्नही किरीट सोमैय्या यांनी केला आहे. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीआधी आणखी तीन घोटाळे बाहेर काढणार असल्याचा दावादेखील किरीट सोमैय्या यांनी केला आहे.