#प्रभात_दीपोत्सव_२०२० : सुंदर हिरवे स्वप्न-वासोटा

सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेला असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेला वासोटा किल्ला आजही ट्रेकर्सना अक आव्हानच वाटतो. या किल्ल्याचे दुसरे नाव व्याघ्रगड असे असून किल्ल्यावरील जंगलात आढळणाऱ्या पट्टेरी वाघ, बिबट्या आणि क्वचित काळा वाघ अर्थात जॅग्वारवरुन हे नाव मिळाल्याचे मानले जाते. सह्याद्री पर्वतराजीला पडलेले सुंदर, हिरवे स्वप्न असे वासोटा किल्ल्याचे वर्णन सातारा येथील एका कवीने केले आहे. हे वर्णन किती सार्थ आहे, ते प्रत्यक्ष तिथे गेल्याशिवाय समजत नाही. 

कोयना धरणाच्या निर्मितीनंतर निर्माण झालेले पश्‍चजल क्षेत्र (बॅकवॉटर) म्हणजेच शिवाजीसागर जलाशय होय. बामणोली येथून मोटर लॉन्चने आपण वासोटा किल्ल्याचा पायथा असलेल्या मेट इंदवली येथे पोहोचतो. येथे वन खात्याचे चेकपोस्ट असून एका सभागृहात एक मोठे प्रदर्शन मांडले आहे. त्यामध्ये कोयना अभयारण्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या जैवविविधतेचे दर्शन घडते. आता कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे.

तर, मेट इंदवलीचे प्रदर्शन पाहून आपण मारुती कट्ट्यापासून वासोटा चढण्यास सुरूवात करतो. लालबुंद माती, निळेशार आकाश, निळेनिळे पाणी आणि सदाहरित जंगलाची हिरवाई, अशा नैसर्गिक वातावरणात आपण पोहोचतो. वासोटा पदाक्रांत करण्यास किमान दोन ते अडीच तास लागतात. वाटेत एका ठिकाणावरुन नागेश्‍वर सुळ्याला जाण्याचा रस्ताही दिसतो.

वासोटा किल्ल्याभोवती असलेल्या जंगलात जांभूळ, ऐन, किंजळ, खैर, आंबा, शिरीष, चिंच या आणि अशाच देशी झाडांची गर्दी दिसते. तसेच अजगरे, गवे, वाघ, तरसे, कोल्हे, हरणे, कोब्रासह अनेक जातींचे सर्प, फुलपाखरे, किटक, गरूड, घार, शिंगचोचा अर्थात हॉर्नबिल, वटवाघुळे, खंड्या, बगळे अशी पक्षांचे अस्तित्त्व दिसते.

किल्ल्याच्या दरवाजामधून आत गेल्यानंतर डाव्याबाजूलाच बिन छपराचे हनुमानाचे मंदिर आहे. त्यासमोरील जाणारी वाट किल्ल्यावरील भग्न अवस्थेत असणाऱ्या वाड्याजवळ घेऊन जाते. या वाड्याचा चौथरा आजही मजबूत असून कलाकुसर पहावयास मिळते. या चौथाऱ्यातून आत उतरल्यावर वाड्याच्या मुख्य चौकात आपण पोहाचतो. या ठिकाणी पाण्याचे नाले पहावयास मिळतात.

या वाड्यापासून काही अंतरावर म्हातारीचा अंगठा नावाने दिसणारा समोरील डोंगर आणि त्याचबाजूला नागेश्‍वरची गुहा पहावयास मिळते. हनुमानाच्या मंदिरापासून डाव्याबाजूने जाणाऱ्या रस्त्यावरून जाताना चुन्याच्या घाणीचे अवशेष पहायला मिळतात.

बाबू कड्यावरून पाहताना जबरदस्त धडकी भरवणारी खोलवर जाणारी दरी दिसते. त्याचबरोबर निसर्गाचे विविध अविष्कारही पहायला मिळतात. या दरीजवळच्या खिंडिपलीकडे लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजे जुना वासोटा होय. डोंगरावरील घनदाट अरण्यात उभा असलेल्या या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. या दोन्हीं किल्ल्यांमध्ये बरेच अंतर आहे. या किल्ल्यामध्ये तटबंदी किवा कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. घनदाट अरण्य, वन्य श्‍वापदे या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे बोलले जाते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.