वार्षिक भविष्य; दिवाळी 2020 ते दिवाळी 2021

वार्षिक भविष्य : दिवाळी २०२० ते दिवाळी २०२१
सौ. अनिता संजय केळकर


मेष –

बेधडक मुसंडी मारून पुढे जाण्याची तुमची वृत्ती असते. त्यामध्ये पुढे काय होईल याचा जास्त विचार न करता कृती करण्याची घाई असते. उत्सह, ताकद व निश्‍चयात्मक प्रवृत्तीमुळे जीवनात बरेच काही मिळते. यावर्षीही गुरुच्या कृपेने कामे गती घेतील. तेव्हा काळजीपेक्षा कृती श्रेष्ठ मानून कामाला लागणे बरे.

व्यवसाय, धंद्यात कर्तृत्वाचे बाबतीत अनुकूलता राहील. नवीन कामे मिळतील. धनप्राप्तीसाठी डिसेंबर, मार्च, जून, सप्टेंबर हे महिने विशेष अनुकूल आहेत. या वर्षी वर्षभर गुरुकृपा असल्याने धनाची चिंता करावी लागणार नाही. मार्च/एप्रिलमध्ये विशेष खर्च होईल. स्थावर इस्टेट व वाहनसुख वर्षभर मिळेल. महत्त्वाची कामे नवीन वर्ष सुरु झाल्यापासून मेपर्यंत पार पडतील.

नोकरीत डिसेंबर ते एप्रिल या मुदतीत कामात वर्चस्व गाजवाल. पैशापेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ असते, याचा प्रत्यक्ष येईल. मात्र तुमच्या तापट स्वभावामुळे नुकसान होणार नाही व शत्रुत्व वाढणार नाही, याची विशेष काळजी घ्या. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना नवीन वर्षात चालना मिळेल. 

जोडधंदा असणाऱ्यांना हे वर्ष शुभ फलदायी आहे. घरात जोडीदार, भागिदार यांचे सुख उत्तम मिळेल. मे ते सप्टेंबर या मुदतीत मात्र त्यांचेशी जुळवून घेऊन वागणे आवश्‍यक आहे. ऐहिक व पारमार्थिक विचारांचा झगडा सतत चालणार आहे व आपले खरे कल्याण कशात आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे हिताचे ठरणार आहे.

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला नवीन वर्ष अनुकूल आहे. यश मिळेल. कलावंत, खेळाडू, राजकारणी व्यक्‍तींनी स्वत:चे मन बाजूला सारून विचारपूर्वक निर्णय घेऊन वागण्याचा प्रयत्न करणे व पावले टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी “विवेके दृढ धरावी। वाट सत्याची।।’ हे संतवचन सतत लक्षात ठेवावे.


वृषभ- 

राशी स्वामी शुक्र असल्याने तुमचा मुलत: स्वभाव थोडा ऐषोराम करण्याकडे असतो. या तुमच्या नैसर्गिक स्वभावाला थोडी मुरड घालावी लागते. बाकी ग्रहांची साथ मिळेलच.

तुम्ही कितीही ऐहिक जीवन श्रेष्ठ मानणारे असलात तरी नवीन वर्षात तुमचे अध्यात्मिक जीवनाकडे लक्ष जाईल व गुरु ते काम करेल.

व्यवसाय, धंद्यात उत्तम प्रगती होईल. फेब्रुवारी ते एप्रिलमधे काही बदल घडण्याचे प्रसंग येतील. तरी गुरुकृपेने त्यातून पार पडाल. महत्त्वाची कामे नवीन वर्षारंभी सुरू करून त्यात बरीच मजल माराल. यशाची मजा चाखता येईल. आर्थिक बाबतीत फार अपेक्षा न बाळगणे बरे. मात्र पैशाची मुळीच काळजी करावी लागणार नाही. कर्तृत्वाने श्रेष्ठत्व लाभेल व भाग्योदयही होईल.

नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल. मात्र स्वार्थी सहकाऱ्यांपासून चार हात लांब राहणे हितावह राहील. नोकरीत बदल व बढतीसाठी एप्रिल/ मे कालावधी उत्तम राहील. महत्वाची जबाबदारी सोपविली जाईल. त्यामुळे नवीन आव्हाने स्वीकाराल.

कामानिमित्ताने लांबचा प्रवासयोग संभवता. जून ते ऑक्‍टोबर या दरम्यान सुखद बातमी कळेल.
घरात कौटुंबिक जीवनात संमिश्र घटना घडतील. टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे तुमची चिडचिड होईल. जमाखर्च सांभाळताना जानेवारी ते जून थोडी तारांबळ होईल. वास्तु बदल करणे तुम्हाला आवडत नाही;

परंतु जूननंतर बदल संभवतो. तरुणांचे विवाह नवीन वर्षात ठरतील व पार पडतील. सामाजिक कामात तुमची हौस फारशी पूर्ण होणार नाही. प्रकृतीचे तंत्र सांभाळून व शारीरिक मर्यादांचा विचार करून कामे हाती घ्या. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची उत्तम संधी चालून येईल. एकंदरीत अनुकूलतेचे वर्ष आहे.


मिथुन-

राशीस्वामी बुध आहे व त्याचा संबंध बुद्धिशी आणि वाचेशी असतो. अनेक विषयांचे आकलन करून त्यातील मर्म शोधून काढणे आवडते. बुद्धीची अचाट, अफाट झेप व उत्तम स्मरणशक्‍ती असते. नवीन वर्षात महत्वाचे सर्व ग्रह तुम्हाला साथ द्यायला राजी असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. फार मोठी स्वप्ने न बाळगता जमिनीवर राहावयाचे तुम्ही निश्‍चित केलेत, तर अनेक प्रश्‍नांना समर्थपणे तोंड देऊ शकाल. आर्थिक स्थिती व मनोधैर्यही चांगले राहील.

व्यवसाय, धंद्यात नोव्हेंबर ते मार्च हा काळ प्रयत्नाच्या पटीत यश देणारा आहे. एप्रिल-मे खर्च वाढतील. अनपेक्षित खर्चामुळे इच्छेविरुद्ध कर्ज काढावे लागेल. जूननंतर मात्र भरपूर काम मिळाल्याने कामे करून आर्थिक तणाव कमी करू शकाल. थोडक्‍यात “अंथरुण पाहून पाय पसरणे’ हे पक्के लक्षात ठेवा.

नोकरीत कामाचा दवाब वाढेल. त्यामुळे थोडी अस्वस्थता व अशांतता येईल. मात्र नवीन वर्षात हे प्रमाण हळुहळु कमी होईल. एप्रिल ते ऑगस्ट या काळात नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घ्या. अत्यावश्‍यक असल्याखेरीज कामात बदल करण्याच्या भानगडीत पडू नका.

बेकार व्यक्‍तींना डिसेंबरपूर्वी काम मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जर परदेशी जाण्याची संधी मिळत असेल तर त्यांनी अवश्‍य प्रयत्न करावा. कोणत्याही मागण्यांसाठी हट्ट धरू नये. नशिबापेक्षा प्रयत्नांवर जोर द्यावा.

घरात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. त्यामुळे थोडा तणव जाणवेल. हीच तुमच्या (खरी) बुद्धिमत्तेची कसोटी आहे. त्यातून पार पडण्यासाठी आताच नियोजन करा. जूननंतर दिलासा देणाऱ्या घटना घडतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. कलावंत, खेळाडू, राजकारणी व्यक्‍तींना पुढील काळ उज्जवल यश देणारा आहे. मानसन्मानाचे योग येतील.


कर्क –

मुत्सद्दी म्हणून तुमच्या राशीचे विशेष महत्त्व आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहण्याच्या तुमच्या स्वभावाची खरी कसोटी येत्या वर्षात आहे. विनाकारण कोणताही धोका पत्करायचा नाही असा निश्‍चय केलात तर त्याचा उपयोग होईल.

धंद्यात व व्यवसायाच्या दृष्टीने येणारे वर्ष तुमच्या गुणांना आणि उद्योगप्रियतेस चालना देणारे आहे. याच काळात नवीन उत्पन्नाचे साधन निर्माण कराल. मात्र थोडे जपून सावधगिरीने निर्णय घ्या. तुमचे अंदाज चुकण्याची शक्‍यता आहे.

खुप पैसे मिळवण्याच्या मोहापायी उंच उडी घेऊ नका. त्यापेक्षा सबुरीचे धोरण महत्वाचे व फायदेशीर राहील. नवीन वर्षात देणी निर्माण होणार नाहीत, याकडेही विशेष लक्ष द्या. जोडधंदा असणाऱ्यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

नोकरीत नवीन वर्षात वरिष्ठांकडून मागण्या मान्य करून घेण्यात यशस्वी व्हाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवासयोग संभवतो. जून नंतर नको त्या ठिकाणी मनाविरुद्ध बदली होण्याची शक्‍यता आहे. स्वत:हून कुठलाही बदल न करणे हितावह राहील. बेकार व्यक्‍तींना फ्रेब्रुवारीपर्यंत कामाची नवीन संधी मिळेल.

घरात व कौटुंबिक जीवनात येत्या वर्षात मनशांती व समाधान मिळेल. मात्र मोठ्या महत्त्वाकांक्षेच्या मागे लागून स्वत:चे शारीरिक स्वास्थ्य बिघडवू नका. डिसेंबर ते मार्चमध्ये घरात विवाह, वास्तुशांत किंवा तशाच प्रकारचा एखादा शुभ समारंभ पार पडेल. घरात खर्चाचे प्रमाण खुप वाढल्याने आर्थिक ताण जाणवेल.

विद्यार्थ्यांनी अपेक्षित कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी तडजोडीची तयारी ठेवावी. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्‍तींना नवीन वर्ष आव्हानात्मक ठरेल. एकंदरीत कमी अधिक प्रमाणात संघर्ष करावा लागेल.


सिंह –

सहसा कोणतेही बदल न करता ठराविक पद्धतीने पण आपल्याच नादात मशगुल राहणारी तुमची रास आहे. येणाऱ्या वर्षात मात्र स्वत:च्या महत्त्वाकांक्षेपोटी तुम्ही मोठे बदल स्वीकाराल आणि त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत कराल. तुमच्यातील नेतृत्व गुणांना योग्य संधी मिळाल्यामुळे तुमची महत्वाकांक्षा बळावेल. हे सर्व साध्य करण्यासाठी जूनपर्यंत तपश्‍चर्या करावी लागेल.

धंदा व्यवसायात नवीन कल्पना व नावीन्यपूर्ण कार्यपद्धती तुम्हाला दंग ठेवेल. कामानिमित्ताने कदाचित परदेशवारीही होईल. मात्र नवीन वर्षात तुमची उमेद जरी कायम असली, तरी खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल.

पैशाची आवक-जावक समसमान राहील. त्यामुळे हाती शिल्लक राहणार नाही. जूननंतर तुमच्यातील इच्छा आकांक्षा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. काहीतरी भव्यदिव्य केले पाहिजे, या कल्पनेने मोठ्या प्रमाणावर धोका पत्करूनही नवीन बेत कृतीत आणाल व त्यातून तुम्ही तुमचे वेगळेपण सिद्ध कराल. नोकरीत येणारा काळ अनुकूल आहे. तुमच्या गुणांची कदर होईल. खास प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. नवीन वर्षात महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल.

मे नंतर मात्र कामाच्या स्वरूपात बदल संभवतो. सुरुवातीला हा बदल नकोसा वाटला तरी ऑगस्टनंतर त्यातून काहीतरी चांगलेच निष्पन्न होईल. बेरोजगार व्यक्‍तींना मे पर्यंत काम मिळेल. जोडधंदा असणाऱ्यांची बरीच उलाढाल होईल. घरात गृहसौख्याच्या दृष्टीन आनंदाची पर्वणी ठरेल, असा काळ आहे.

खर्च वाढले तरी तुम्ही समाधानी रहाल. तरुणांचे विवाह ठरतील व पार पडतील. कुटुंबासमवेत दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रतिष्ठा वाढवणारी खरेदी होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना क्षेत्रात नाव कमावता येईल.


कन्या –

सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. त्यामुळे तुमची महत्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढत जाईल. नशिबाची साथ मिळेल. मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक ऊब चांगली मिळेल. त्यामुळे येणारे वर्ष तुम्हाला संस्मरणीय ठरेल.

धंदा व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांशी प्रमाणात सफल होईल. जानेवारीमध्ये उत्पन्नात चांगली भर टाकणारे एखादे नवीन साधन मिळू शकेल. चालू व्यवसायात कार्यक्षमता वाढवून उलाढालीत लक्षणीय वाढ करू शकाल.

महत्त्वाकांक्षेपोटी एखादा मोठा प्रकल्प राबविण्याचा विचार जूननंतर येईल. फायद्याचेही प्रमाण अपेक्षेप्रमाणे वाढेल. तरीही तेव्हा खेळत्या भांडवलाची गरज भासेल. शारीरिक पात्रतेचा विचार करून कोणतेही पाऊल उचलावे; नाहीतर सर्व काही चांगले असूनही आनंद घेता येणार नाही.

नोकरीत संपूर्ण वर्ष मन:शांती व समाधान देणारे आहे. चालू, हाती असलेल्या कामाच्या कष्टाचे श्रेय मिळेल. नवीन वर्षात पगारवाढ व बढतीचे स्वप्न साकार होईल. बढतीबरोबर जबाबदारीही वाढेल याची मनाशी खुणगाठ बांधा. बेकार व्यक्‍तींना काम मिळत राहील. मात्र ते त्यांनी टिकवण्याचा प्रयत्न करावा. जोडधंदा असणाऱ्यांना पूर्वार्ध (जून 2021 पर्यंतचा) काळ अनुकूल आहे.

घरात कौटुंबिक जीवनात कार्यसाफल्यामुळे तुमचे स्थान आदरणीय राहील. अपेक्षित सहकार्य व मान मिळेल. विवाहोत्सुक व्यक्‍तीचे विवाह मेपर्यंत ठरतील वा होतीलही. जादा कमाईतून नवीन गुंतवणूक व जागा जमीन खरेदी करता येईल.

विद्यार्थ्यांना वर्ष उत्तम आहे. उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना संधी मिळेल. सामूहिक कामाशी निगडित असणाऱ्या व्यक्‍तींना मेनंतरचा काळ जास्त अनुकूल राहील. एकंदरीत येणारे वर्ष आलबेल ठेवणारे आहे.


तूळ –

सकारात्मक दृष्टिकोन असणारी तुमची रास आहे. आशा-निराशेच्या लपंडावातून तुम्ही भविष्याकडे कुतूहलाने पाहत असाल, तर तुम्हाला निश्‍चितच आशादायक चित्र असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्यातील महत्वाकांक्षा जागृत होऊन यशाची भरारी मारण्याची मनीषा ठेवू शकाल.

धंदा व्यवसायात एखाद्या चांगल्या घटनेची नोंद आगामी डिसेंबर-जानेवारीमध्ये होईल. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता…’ असा दृष्टिकोन ठेवून कार्यरत राहा. उत्पन्नाचे प्रमाण हळूहळू वाढेल.

कर्जे संपून चार पैसे हाती शिल्लक राहतील. नवीन वर्षात मात्र कुठल्याही अतिमहत्वाकांक्षेपोटी प्रलोभनांना बळी पडू नका. नोकरीत व्यक्‍तींना मनाप्रमाणे वागण्याची मुभा मिळेल. मात्र त्याचा गैरफायदा घेऊ नका. पूर्वी झालेला अन्याय दूर करणे, हे तुम्हाला आता शक्‍य होईल.

नवी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना जानेवारी ते जून या काळात चांगली नोकरी मिळेल. परदेशगमानाची संधी कामानिमित्ताने चालून येईल. मात्र जून नंतर जाता येईल. 

घरात वाढते खर्च, प्रकृतीच्या तक्रारी, अतिविचार यामुळे बिघडून गेलेले मानसिक संतुलन डिसेंबरपासून पुन्हा हळू हळू पूर्ववत होऊ लागेल. एखाद्या चांगल्या घटनेमुळे घरात तुमच्या आनंदात भर पडेल. तुमच्या रसिक स्वभावाला वातावरण व सभोवतालच्या व्यक्‍तींकडून दाद मिळेल. त्यामुळे तुम्ही खुष राहाल. 

विद्यार्थ्यांना तांत्रिक अडधळे पार करून उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. खेळात प्राविण्य दाखवण्याची सुसंधी चालून येईल.

राजकारणी, कलाकार, खेळाडू यांना आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देऊन स्वत:ची प्रतिभा निर्माण करावी लागेल.


वृश्‍चिक –

गुरुची साथ राहील. त्यामुळे जूनपर्यंत नैतिक जोराच्या बळावर मार्गक्रमण कराल. निराशेचे काही क्षण येतील पण त्याला न जुमानता काम करीत राहिलात, तर अखेर सफलता मिळेल. स्थिरबुद्धी व अचल कृतीसाठी तुमची रास प्रसिद्ध आहे. मात्र जून ते ऑक्‍टोबर या काळात काही बदल घडू शकतात. ते स्वीकारण्याची तुमची मानसिक तयारी ठेवा.

धंदा व्यवसायात संमिश्र फळ पुढील वर्षभर मिळतील. मे पर्यंत कामात बरीच मजल माराल. नंतर थोडी आर्थिक विवंचना राहील. जूनमध्ये एखाद्या महत्त्वाच्या संक्रमणाच्या उंबरठ्यावर तुम्ही असाल. याच काळात मोठे फायदे व मोठे धोके असेच एकंदरीत चित्र असेल. त्यात उडी घेण्यापूर्वी निष्णात व्यक्‍तीचा सल्ला घ्या.

भावनेच्या आहारी जाऊन धोका पत्करू नका. नोकरीत मेपर्यंत एखादी चांगली घटना घडेल.
तुमच्यावर नवीन कामगिरी सोपवली जाईल. प्रशिक्षणासाठी, कामासाठी, परदेशवारीसाठी तुमची वर्णी लागेल. जूननंतर कामाचे स्वरूप बदलेल. बदली, पदोन्नती या निमित्ताने घरापासून लांब राहावे लागेल. पैशाची उब मिळेल, जोडधंद्यातून विशेष लाभ होतील.

घरात गृहसौख्याच्या दृष्टीने कल अनुकूल आहे. मार्चपर्यंतचा काळ खर्चिक व जबाबदाऱ्या वाढवेल. त्यानंतर मात्र उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. तरुणांचे विवाह ठरतील. नवीन जागेत राहावयास जाण्याचे बेत ठरतील. प्रकृतीच्या तक्रारीकडे मात्र दुर्लक्ष करू नका.

विद्यार्थ्यांनी नवीन वर्षात यशाविषयी गाफिल राहून चालणार नाही. अनपेक्षित अडथळे अडचणींना तोंड द्यावे लागेल. सामूहिक कामाकडे व आवडत्या छंदाकडे कितपत लक्ष घालणे जमेल, याची शंका वाटते. एकंदरीत काम व इतर गोष्टी यांची योग्य सांगड घालावी लागेल.


धनु –

राशीधिपती गुरुचे भ्रमण पुढील वर्षभर साथ देणारे आहे. त्यामुळे प्रगतीचा वेग समाधानकारक राहील. धीराने मार्ग आक्रमित राहणे हेच तुमच्या हिताचे राहील. तुमची महत्त्वाकांक्षा वाढवणारे वातावरण सभोवताली राहील. धंदा व्यवसायात पैशाची आवक जावक समसमान राहील. मेनंतर एक चांगल्या महत्त्वाच्या वळणावर तुम्ही पोहचू शकाल.

नवीन उपक्रम हाती घेऊन त्यात यशस्वी होण्यासाठी तुमचा विशेष प्रयत्न राहील. जिद्द व नेटाने काम पूर्ण कराल. मंगळासारखा प्रखर ग्रह तुम्हाला साहसास प्रवृत्त करेल. प्रगतीच्या नवीन संधी नवीन वर्षात चालून येतील. कामानिमित्ताने परदेशवारीही घडल्यास आश्‍चर्य नाही.

नोकरीत सध्याचा काळ थोडा बेचव वाटेल. जानेवारीपासून मात्र कामात बदल घडून येईल. त्यामुळे नव्या उमेदीने कामांना सुरुवात कराल. नोकरीत बदल किंवा बदली करून घेण्याचे विचार तूर्तास मनात घोळत असतील; पण तसे करणे चुकीचे ठरेल. तुमच्या कर्तव्यात कोणतीही कसूर होत नाही ना, याची काळजी घ्या. बेरोजगार व्यतींना नवीन वर्षात काम मिळेल. जूननंतर सध्याच्या नोकरीतील चित्रही बदलेल व उत्साहवर्धक होईल.

घरात कौटुंबिक स्वास्थाच्या दृष्टीने ग्रहमान हळूहळू अनुकूल होईल. प्रकृतीच्या तक्रारी, किरकोळ मतभेद होत राहतील. पण निराश होऊ नका. जानेवारीनंतर घरात चांगला बदल जाणवेल. विवाह, समारंभ, वास्तू खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती साधता येईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत.
सामूहिक क्रीडा, कला क्षेत्रात स्वत:ची उंची व पत राखता येईल, मान मिळेल.

महिलांना आवडता छंद जोपासता येईल. स्वत:चे वेगळे अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. एकंदरीत येणारे नवीन वर्ष बरेच काही चांगले घडवून आणेल.


मकर –

राशीधिपती शनीचे वास्तव्य स्वत:च्या राशीतच असल्याने तुमचे कर्तृत्व दाखवण्याची उत्तम संधी चालून येईल. “हाती घ्याल ते तडीस न्याल’. नवीन वर्षात तुमची आर्थिक स्थिती तुमच्या कल्पनेबाहेर सुधारल्याने एक प्रकारचा नवीन आत्मविश्‍वास तुमच्यात जागृत होईल. मिळणाऱ्या संधीचे सोने करण्याचे स्वाभाविक वैशिष्ट्य्‌ तुमच्यात आहेच. त्याला सुयोग्य वातावरण मिळाल्याने तुम्ही खुश असाल.

धंदा व्यवसायात वेगळ्या क्षेत्रात स्पर्धेला तोंड देत प्रगती करणे हे तुमच्यापुढे मोठे आव्हान राहील. पण जिद्द व चिकाटीच्या जोरावर तुम्ही त्यातही यशस्वीपणे टिकून राहाल. जानेवारीमध्ये नवीन एखादा उपक्रम सुरु करण्याची इच्छा साकार होईल. त्यामुळे व्यवसायातील तुमची प्रतिमा उंचावेल. प्रगतीचा वेगही उत्तम राहील.अत्यंत अवघड वाटणारी कामगिरी व आशा सोहून दिलेली वसुली मेपर्यंत होईल. तुमचे अंदाज अचूक ठरल्याने चांगल्या संधीचा फायदा मिळेल.

नोकरीत व्यक्‍तींना नवीन वर्ष एक ना अनेक कारणांनी फायदेशीर ठरेल. इतरांना न मिळणाऱ्या संधीचा फायदा घेता येईल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. वरिष्ठांकडून तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक लाभ होतील.

पगारवाढ व बढती मिळू शकेल. जोडधंदा असणाऱ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. कामानिमित्ताने प्रवासही घडेल. घरात पैशाची उब व मानसिक समाधान या दोन्ही गोष्टी मिळाल्याने कुटुंबात आनंद व स्वास्थ्य राहील. गुप्त शत्रूंपासून मात्र सावध राहा.

तरुणांना व विवाहोत्सुकांना नवीन वर्ष विवाह ठरणे व होण्याच्या दृष्टीने चांगले आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवून देण्यास अनुकूल वातावरण राहील. मनोकामना पूर्ण होतील.

कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्‍ती यांना जूनपर्यंतचा काळ विशेष चांगला आहे. मानसन्मानाचे योग येतील. सुसंधी मिळेल. उत्तरोत्तर प्रगती होईल.


कुंभ –

महत्त्वाच्या ग्रहांची संमिश्र साथ मिळेल. तेव्हा नवीन वर्षात प्रयत्न आणि नशिब यांची सांगड तुम्ही किती चांगल्या प्रकारे घालू शकता यावर तुमची खरी यशाची भिस्त आहे. स्थितप्रज्ञ म्हणून समजली जाणारी तुमची रास आहे. अर्थाअर्थी काही संबंध नसणाऱ्या बदलांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे काही संभ्रमाचे क्षण येतील हीच तुमची खरी कसोटी आहे, असे समजून समतोल ढळू देऊ नका.

धंदा व्यवसायात डिसेंबरपर्यंत तुम्हाला पूरक घटना घडतील. उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. मनातील बेत कृतीत आणता येतील. आर्थिकमानही सुधारेल. जानेवारीपासून बरीच मेहनत करून नेहमीपेक्षा जास्त पैसे मिळवू शकाल. जूननंतर मात्र उत्पन्न वाढले तरी खर्चही वाढल्याने थोडे विचारात पडाल. याच दरम्यान कामांना नवीन दिशा मिळेल. परदेशगमन व परदेश व्यवहाराची संधी सप्टेंबर नंतर येईल.

नोकरीत व्यक्‍तींना नवीन वर्षात स्वत:चे कौशल्य वाढवण्याखेरीज गत्यंतर राहणार नाही. सध्याच्या नोकरीत फेब्रुवारीच्या सुमारास जे बदल घडतील ते तणाव वाढवणारे असतील. त्यामुळे बदल करावासा वाटेल. कामातील सहकारी व सभोवतालच्या व्यक्‍तींवर विश्‍वास ठेवणे घातक ठरू शकेल हे लक्षात ठेवावे. जून नंतर पगारवाढ होईल. कामानिमित्ताने प्रवास योग येतील.

घरात कौटुंबिक जीवनात काही सुखद प्रसंग नवीन वर्षात घडतील. स्वास्थ्य व समाधान टिकून राहण्यासाठी वर्षभर प्रकृतीचे तंत्र सांभाळणे गरजेचे आहे. तरुणांचे विवाह नवीन वर्षात ठरतील व पार पडतील. करिअरच्या नवीन संधी दृष्टीक्षेपात येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या तत्वाशी तडजोड करणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणासाठी घरापासून लांब राहण्याची तयारी ठेवावी.

सामूहिक क्षेत्रात काही गोष्टींमुळे टिकेला तोंड द्यावे लागेल. खेळाडूंना, कलावंताना प्राविण्य दाखवता येईल.


मीन –

राशी स्वामी गुरू पुढील वर्षभर अनुकूल राहील. नवीन वर्षात बहुतांशी चांगल्या घटना तुमच्या परिश्रमापेक्षा नशिबाची साथ मिळाल्याने घडतील. माणसांची पारख करणे हे तुमच्यापुढे मोठे आव्हान नवीन वर्षात आहे. तरी त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा.

धंदा व्यवसायात नवीन वर्षात तुमची उमेद प्रचंड असेल. त्याच्या जोरावर काहीतरी भव्यदिव्य करून दाखविण्याचा इरादा राहील. आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारेल. मार्चनंतर अशक्‍य वाटणाऱ्या
कामातही यश मिळवाल.

हाती घेतलेली कामे खऱ्या अर्थाने लाभ उठवून पूर्ण कराल. नवीन कामे स्वीकारताना स्वत:ची कुवत व आवाका पाहून पावले उचला. विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील.

नोकरीत नवीन वर्षात तुम्हाला हवी असलेली चांगली संधी चालून येईल. बढती व पदोन्नतीचे योग येतील. नवीन नोकरीत समाधान मिळेल. पैशाच्या पाठीमागे लागून हाती असलेल्या कामावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. जोडधंद्यातून कमाई होईल. मात्र अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने त्यात रस वाटणार नाही. नोकरीत सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल.

घरात नवीन वर्षात आनंददायी प्रसंगाची नोंद होईल. तुमच्या मनाशी बाळगलेले दिर्घकाळचे एखादे स्वप्न साकार होईल. या दरम्यान नवीन वास्तू खरेदी, विवाह व एखादा समारंभपार पडतील. जूननंतर तुमचे विचार बदलतील व प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे कामे हाती घ्याल. नातेवाईक, आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील.

विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे अभ्यास व गोष्टी करता येतील. परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचे असल्यास तयारी करा. यश मिळेल.

खेळाडू, कलाकार, राजकारणी व्यक्‍तींना नवीन वर्ष उत्तम आहे. मनोकामना, मानसन्मान, सुप्त इच्छा पूर्ण होतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.