साथीच्या अन्य आजारात घट : “ओपीडी’तील रुग्ण मात्र वाढले
पिंपरी – दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यानंतर शहरातील विविध भागामध्ये व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असतात. यावर्षी मात्र, “करोना’च्या भीतीने मागील तीन महिन्यांपासून लोकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, यंदा पावसाळा सुरु झाल्यानंतरही तसेच वातावरणात वारंवार बदल होत असनूही व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
शहरात “करोना’चा आकडा दिवसें-दिवस वाढतच चालल्यामुळे नागरिक घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करु लागल्याचे दिसून येत आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर वाढल्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला होणाऱ्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. यावर्षी कधी पाऊस, कधी ऊन असे वातावरण सारखे बदलत आहे. गेल्या एक आठवड्यात एक दिवस पाऊस आणि दोन दिवस उकाडा असे चक्र दिसून येत आहे. वातावरणात असे बदल होत असल्यास एरव्ही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळायचे, परंतु यावर्षी नागरिकांकडून घेतल्या जात असलेल्या सतर्कतेमुळे इतर आजारांची रुग्णसंख्या कमी झाली आहे.
तपासणीसाठी रोज दोन हजार रुग्ण
दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचे प्रमाण यावर्षी कमी झालेले असले तरी महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढत चालली आहे. करोनाच्या भितीमुळे सतर्क झालेले नागरिक सर्दी, खोकल्याचा जराही त्रास वाटला तरी दवाखान्यात धाव घेत आहेत. त्यामुळे, महापालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढत चालली आहे. मागील आठवड्यात महापालिकेच्या दवाखान्यात दररोज 2 हजार पेक्षा अधिक रुग्ण तपासणी करुन गेले आहेत. मागील आठवडाभरात 14 हजार रुग्णांची महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी झाली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला दरवर्षी संसर्गजन्य रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असतात. यावर्षी मात्र नागरिक मास्कचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. त्यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. मास्कचा फायदा यावर्षी मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. ज्या लोकांना अस्थमांचा त्रास आहे त्यांनी बाहेर जातानाच मास्कचा वापर करावा. घरामध्ये, कार्यालयामध्ये मास्क जास्त वापरु नये. धुळीची ऍलर्जी असणाऱ्यांचे आजारही कमी झाले आहेत. मास्क नियमित वापरला तर अन्य आजारही कमी होतील.
– डॉ. अभय तांबिले, सचिव, निमा संस्था