परिसरातील दुकानांची भरारी पथकाकडून तपासणी
येरवडा – लोहगाव येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर भरारी पथकाने दुकानाची तपासणी केली. या तपासणीत दुकानात धान्य कमी आढळून आले आहे. याबाबत येथील दुकानाविषयी नागरिकांचे जाबजबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.
लोहगावातील मोझे आळीत स्वामी समर्थ महिला बचत गट अंतर्गत स्वस्त धान्य दुकान आहे. दुकान वेळेवर उघडत नाही, धान्य कमी दिले जाते. मोफत मिळणारा तांदूळ दिला जात नाही. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थ्यांना डाळ वाटप केली जात नाही, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
यामुळे सुनील खांदवे-मास्तर, संदीप मोझे, सोमनाथ खांदवे, संतोष खांदवे, बंटी जंगम, रावसाहेब राखपसरे यांनी स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारीबाबत समिती गठीत करून रेशन कार्डधारकांच्या तक्रारी प्राप्त करून घेतल्या होत्या. पुरवठा कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुरवठा निरीक्षक रविकिरण शेटे, नगररचना विभागाचे अधिकारी घोडके यांच्या भरारी पथकाने स्वस्त धान्य दुकानाची अचानक तपासणी केली.
या तपासणीत धान्य कमी आढळून आले. याबाबबत नागरिकांही जबाब दिले आहेत. भरारी पथक सर्व अहवाल तयार करून कारवाईसाठी एफडीओकडे पुढे ठेवणार असल्याची माहिती ई परिमंडळ विभागाचे अधिकारी प्रशांत खताळ यांनी दिली.