नगर – महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयामध्ये रुग्ण सारिका आव्हाड ऍडमिट होण्यासाठी आले असता रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दाखल करून न घेता सिव्हिल हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना फोन लावला व तक्रारीचा पाढा वाचला, त्यानंतर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्वतः आजारी असताना दवाखान्यात भेट देत कामकाजाची माहिती घेत डॉक्टरांना धारेवर धरले.
रुग्ण बाळासाहेब देशपांडे रुग्णालयावर विश्वास ठेवत येथे बाळंतपणासाठी येत असतात, या ठिकाणी जागा असताना देखील रुग्णालयात दाखल करून का घेतले नाही अशा प्रश्नांचा भडीमार करत कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले.
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अचानक मनपाच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात भेट देत तेथील कामकाजाची माहिती घेतली यावेळी आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी डॉ. सतिश राजूरकर आदी उपस्थित होते.
मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे अचानक थेट कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात गेले असता तेथे नर्स सोडून जबाबदार कोणतेच डॉक्टर, अधिकारी उपस्थित नव्हते, दरम्यान आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी तातडीने तेथील कार्यरत डॉक्टर, अधिकारी यांना बोलावून घेतले आणि धारेवर धरले यावेळी आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांना सूचना देत सांगितले की हॉस्पिटल मधील डॉक्टर,अधिकारी व कर्मचारी यांचा लेखी जबाब नोंदवून घ्यावा व कागदपत्रांची तपासणी करून कारवाईचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिल्या.