संगमनेर – जगभर पसरलेल्या करोना विषाणूने अवघ्या मानवजातीवर दहशत निर्माण केलेली आहे. असे असताना आता या दहशतीतून पुतळेही सुटले नसल्याचे दिसत आहे. संगमनेर नगरपालिकेने उभारलेल्या शहरातील अशाच एका पुतळ्यानेही आता आपल्या तोंडावर मास्क परिधान केला असून, त्यातून हा निर्जीव पुतळा लाख मोलाचा सल्लाही देत आहे. रविवारी (ता.7) अचानक मास्कर घातलेला हा पुतळा पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असले, तरी या दृश्यातून बहुतेकांना मास्क घालण्याची सूचनाही मिळाली आहे, हे महत्त्वाचे.
मागील अडीच महिन्यांपासून संगमनेरात करोनाचा कहर सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या आकड्यांमुळे करोनाने संगमनेरकरांच्या मनात मोठी दहशतही निर्माण केली आहे. 30 मार्चपर्यंत एकही रुग्ण नसलेल्या संगमनेर तालुक्यात अवघ्या दोनच महिन्यांत तब्बल 62 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केवळ शहरच नव्हे, तर अख्खा तालुका हादरला आहे. शासकीय यंत्रणेकडून अगदी सुरुवातीपासून नागरिकांना विविध सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले जावूनही अनेकांना अजूनही त्याचे गांभीर्य नसल्याने आता निर्जीव पुतळ्यांनीच लोकांची जागृती करण्यास सुरुवात केली आहे.
शहर सुशोभीकरण मोहिमेत पालिकेने नवीननगर रस्त्यावर बळीराजाचा, तर 132 केव्ही सबस्टेशनजवळील बायपासवर योगसाधना करणाऱ्या युवकाची प्रतिकृती उभारली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीचा अनुभव करणाऱ्या या दोन्ही निर्जीव प्रतिकृतींनाही आता नागरिकांचा आततायीपणा खटकू लागल्याने त्यातील योगसाधना करणाऱ्या युवकाच्या पुतळ्यानेच तोंडावर मास्क लावला आहे. अर्थात नागरिकांत जनजागृती करण्यासाठीच हा प्रयत्न एखाद्या सुजाण नागरिकाने केले असेल, तरीही त्यातून मोठा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. हा पुतळा गेल्या दोन दिवसांपासून संगमनेरात चर्चेचा ठरला आहे. आतातरी संगमनेरांनी यातून बोध घ्यावा, असेच या पुतळ्याकडे पाहून प्रत्येकजण पुटपुटत आहे.