84 वर्षांची परंपरा; 2 हजार 1 नंदादीपांचा समावेश
उमेश सुतार
कराड – श्रद्धेच्या महात्म्याबरोबर समतेचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा पाटण तालुक्यातील मारूल हवेली येथील नंदादीप उत्सव 84 व्या वर्षीही अखंडीतपणे सुरु आहे. सिद्धेश्वराच्या साक्षीने याठिकाणी सुमारे दोन हजार एक नंदादीप रात्रंदिवस तेवत असून हा प्रकाशमान सोहळा पाहण्यासाठी श्रावणसरी झेलत पर्यटक, भाविक दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत.
मारुल हवेली, ता. पाटण येथील जागृत देवस्थान असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील या अनोख्या नंदादीप उत्सवाला 83 वर्षे पूर्ण झाली आहेत. उत्सवाचे यंदाचे 84 वे वर्ष असून नवसाला पावणाऱ्या या सिद्धेश्वर देवालयात दैनंदिन दर्शनासाठी भाविक श्रद्धापूर्वक येत असतात. 1936 रोजी रंगनाथ कुलकर्णी व ग्रामस्थांनी श्रावण महिन्यात अवघ्या पाच समई प्रज्वलीत करून ही परंपरा त्याकाळी सुरू केली होती. ती अनोखी परंपरा आजही अविरतपणे याठिकाणी सुरू आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 2001 समई तेवत असून मंदिराचा सर्व परिसर समईंच्या तेजानी प्रकाशमान झाला आहे.
सिद्धेश्वराच्या हेमांडपंथीय रचनेच्या नवीन मंदिरातील गाभाऱ्यात व मंदिराच्या हॉलमध्ये या 2001 समई दिवसरात्र अखंडितपणे पूर्ण महिनाभर तेवत ठेवल्या जातात. या दीपोत्सवात सर्व जाती, धर्माचे लोक भक्तीभावाने सहभागी होत असतात. गोवा, कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील भाविक या उत्सवात सहभागी झाले आहेत. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होत असते. सिक्कीम माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे हे गाव असून राजकीय मतभेद विसरून गावात हा उत्सव साजरा केला जातो.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी सिद्धेश्वर मंदिरात महारुद्राभिषेक, महापूजा, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याठिकाणी आपल्या नावाची समयी लावल्यानंतर मनातल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या नंदादीप उत्सवाची महती दिवसेंदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर वाढत आहे.