तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा उत्सव यावर्षी ९ ते १२ एप्रिल दरम्यान होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन मारुती काकडे यांनी दिली.
यावर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, कुस्ती स्पर्धा, बैलगाडा शर्यत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ एप्रिल रोजी सकाळी श्री डोळसनाथ महाराज यांना अभिषेक, दुपारी बैलगाडा शर्यत, सायंकाळी श्री डोळसनाथ महाराजांची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा, रात्री घोरावाडी स्टेशनाच्या मैदानावर वसंत नांदवळकर यांचा तंटा तिघींचा पण नवरा कुणाचा या वगनाट्यांव्दारे तमाशा तसेच मंदिरासमोर श्री राम कला पथक मंडळ (पवळेवाडी) यांचे भारूड होणार आहे.
दुसऱ्या दिवशी गणपती माळ येथे दुसऱ्या दिवशीच्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री ८ वाजता मारुती मंदिर चौकात बारा गांवाच्या बारा अप्सरा हा आर्केट्राचा कार्यक्रम होणार आहे.
दि. ११ रोजी दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत भोई आळी मळा येथील मैदानात निकाली कुस्त्यांचा सामना होणार आहे. यासाठी एकून ७ लाख ७ हजार ७७७ रुपया पर्यत बक्षिसे ठेवली आहेत. तसेच चांदीच्या गदा, शिव प्रतिमा, आदी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दि. १२ एप्रील रोजी रात्री ८ वाजता शैलेश लोखंडे प्रस्तुत लावण्य चंद्रा आर्केट्राचा कार्यक्रम श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.