तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या उत्सावाला सुरवात झाली आहे. यानिमित्त बैलगाडा शर्यतीसह मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे श्री डोळसनाथ महाराजांच्या अभिषेकाने उत्सवास सुरूवात झाली. उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन काकडे, पदाधिकारी प्रणव दाभाडे, स्मितेश भेगडे, सुधीर सरोदे आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपुरोहित अतुल रेडे यांनी अभिषेक केला.
गणपतीमाळ येथे सकाळी आठ वाजता बैलगाडा स्पर्धा सुरु करण्यात आल्या. बैलगाडा घाटाची पूजा अजिक्य सातकर, दिनकर भेगडे यांच्या हस्ते करण्यात आली. पहिल्या दिवशी टोकनचे १५० गाडे तर गावातील ५० गाडे स्पर्धेत सहभागी झाले.
सायंकाळी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या मंदिरातून ग्राम प्रदक्षिणेसाठी पालखीचे प्रस्थान झाले. श्री डोळसनाथ मंदिरापर्यंत पालखी प्रदक्षिणा झाली. यावेळी फटाके, ढोल लेझीम, बँड, भजनकरी सहभागी झाले होते. पालखीच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती.
यात्रे निमित्त पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक आयुक्त देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडेचे निरीक्षक किशोर पाटील व सहकाऱ्यानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.