पुणे – विवाहात ठरल्याप्रमाणे पाहुण्यांना मस्तानी दिली नाही म्हणून एका विवाहितेचा छळ करण्यात आला. तीला प्लॅस्टीकच्या बॅटने पतीकडून मारहाणही करण्यात आली. तसेच सरकारी अधिकारी असलेल्या सासूनेही छळ केला. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात पतीसह सासूविरुध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बाणेर येथे रहाणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. तीचा २०१४ रोजी विवाह झाला होता. विवाह ठरवताना सासरच्या व्यक्तींनी लग्नात पाहुण्यांना पुण्यातील प्रसिध्द मस्तानी देण्याचा आग्रह केला होता. मात्र विवाहितेच्या माहेरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी मस्तानीचा बेत ठेवला नाही.
या कारणावरुन विवाह झाल्यानंतर तीचा सातत्याने छळ केला जात होता. तसेच तीची सासू सातत्याने मी बडी सरकारी अधिकारी आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, तु अतिसामान्य घरची आहेस, तुझी लायकी नसताना आमच्या घरी आली असे टोमणे मारत होती.
यानंतर माहेरुन पैसे घेऊन येण्यासाठी सातत्याने तीचा छळ केला जात होता. तीला पतीने अनेकदा प्लॅस्टीकच्या बॅटने मारहाणही केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शामने करतात.