सोमवारपासून अनिश्चित काळासाठी बंद होतोय भुसार बाजार
पुणे – मार्केट यार्डातील भुसार बाजारात शनिवारी शहरातील अन्नधान्य, कडधान्य डाळी किराणा विक्रेत्यांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत चौकट मालाची विक्री झाली. विक्री झालेल्या मालातून शहराची अन्नधान्य, कडधान्य आणि किराण्याची पुढील पंधरा दिवसांची गरज सहजपणे भागणार आहे. सोमवारपासून गुळ, भुसार विभाग अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मालाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शहर, उपनगरातील दुकानदारांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यांनी अधिकाधिक मालाची खरेदी केली.
याविषयी दि पूना मर्चंटस चेंबरचे सचिव विजय मुथा म्हणाले, महापालिकेने शहराचा पूर्व भाग करोनाचा संसर्ग वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर सील केला आहे. मार्केट यार्डही त्याच भागात आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कामगारांना कामावर येणे अवघड बनले आहे. पोलिस सहकार्य करत नसून, त्यांचे ओळखपत्र गृहीत धरत नाहीत.डिजिटल पासची मागणी करत आहेत. ट्रक माल घेऊन येताना चालकाला त्रास होत आहे. या परिस्थितीमुळे सोमवारपासून अनिश्चित काळासाठी भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज बाजार सुरू होता रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे खरेदीसाठी शहरातील दुकानदारांनी मोठी गर्दी केली होती. ज्याला एक पोते मालाची गरज होती. त्यांनी चार पोती मालाची खरेदी केली. आज खरेदी केलेला माल पुढील पंधरा ते वीस दिवस शहराला पुरणार आहे. दरम्यान मार्केट यार्डातील भुसार बाजारात शनिवारी तब्बल वीस हजार 780 क्विंटल आवक झाल्याची माहिती भुसार विभाग प्रमुख नितीन रासकर यांनी दिली.