Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे याच आरक्षणासाठी तरुण मृत्यूला जवळ करताना दिसून येत आहेत. राज्यात आता पर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आपले आयुष्य संपवले आहे. त्यातच आणखी एक भर पडली आहे. हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपलं जीवन संपवलं आहे.
हिंगोलीतील आत्महत्या केलेल्या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्यात, मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय?, असा त्याने उल्लेख केला आहे. आदिनाथ राखोंडे (वय 27 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील 27 वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी विजेच्या ताराला स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य राखोंडे असं मयत युवकाचे नाव असून, तो उच्चशिक्षित होता. मात्र, असे असताना नोकरी मिळत नसल्याने तो निराश झाला होता. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आदित्यचा सहभाग होता.
“एक मराठा लाख मराठा…मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे.” असे लिहून ठेवत या युवकाने टोकाचे पाऊल उचलले.