महायुतीच्या यशाच्या मार्गात अनेक अडथळे

स्वपक्षांकडून आता पाडापाडीचे राजकारण : लोकसभेला राबणारी विखेंची यंत्रणा विधानसभेत गायब 

नगर  – मैदानात कुणी पहिलवानच दिसत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरी कुस्तीच्या मैदानात कोणता पहिलवान कशी कुस्ती मारील आणि नामांकित पहिलवानालाही चीत-पट करील, हे सांगता येत नसतं. जिल्ह्यात 12 – 0 असा निकाल लावू म्हणणारे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे राज्याचे नेते पण आता ते तीन मतदारसंघात गुंतले.

एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीत राबणारी त्यांची यंत्रणा या विधानसभेत कोठे गायब झाली. असे प्रश्‍न निर्माण होत असतांना मंत्रीपदाचे दावेदार ठरणारे अनेक जण आता “डेंजर झोन’मध्ये आले आहेत. स्वपक्षाकडून पाडापाडीचे राजकारण रंगू लागल्याने महायुतीच्या यशाच्या मार्गात अनेक अडथळे वाढल्याचे दिसू लागले आहेत. परिस्थिती बदलू लागल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून लागले आहे.

जिल्ह्यातही बाराच्या बारा जागा आम्हीच जिंकू, अशा आविर्भावात युती असली तरी वस्तुस्थिती बदलत आहे. महायुतीला वाटतं तेवढं सोपं नाही. सध्या तरी जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात “काटेकी टक्‍कर’ सुरू झाली आहे. त्यामुळे महायुतीचे नेते अस्वस्त झाल्याचे दिसत आहे. भाजप व शिवसेनेकडून सध्या अडचणीच्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचा खटाटोप सुरू आहे. कर्जत- जामखेड हा मतदारसंघ भाजपच्या दृष्टीने महत्वाचा असून या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या चुरस निर्माण झाली आहे. शिंदेंकडून आवश्‍यक त्या उपाययोजना व दुरुस्ती करण्यात येत आहे. तरी पवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभांमुळे परिस्थितीत काहीचा बदल झाल्याने आता शिंदे देखील पक्षाध्यक्ष अमित शहा यांची सभा घेवून परिस्थिती नियंत्रणात आण्याचा प्रयत्न करीत आहे.

अकोलेमध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले वैभव पिचड व भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले डॉ. किरण लहामटे यांच्यात लढत होत आहे. येथे सुरवातीला एकतर्फी निवडणूक होईल असे वाटले होते. पण डॉ. लहामटे यांनी चुरस निर्माण केली आहे. ज्यांनी पिचडांना भाजपची वाट दाखविली ते विखे अकोलेत फिरकले देखील नाहीत. त्यामुळे पिचडांची एकाकी झुंज चालू आहे. पिचडांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले असले तरी त्यात काही प्रमाणात फुट पाडण्यात पिचडांना यश आले असले तरी डॉ.लहामटे यांनी थोड्या दिवसात मतदारांपर्यंत पोहचून काटेकी टक्‍कर असल्याचे दाखवून दिले.

पारनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजय औटी हे देखील अडचणीत सापडले आहेत. त्यांनी वाटते तेवढी निवडणुक सोपी राहिली नाही. शिवसेना व भाजपमधील बंड थोपविण्यात यश मिळाले. पण ही मंडळी मनापासून काम करता का? असा प्रश्‍न आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी औटींसमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. विखेंचे कट्टर समर्थक माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी औटींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त करून लंकेकडे आपला कल असल्याचे निर्देश दिले आहे. त्यात औटींकडून मिळालेली वागणूक अनेक जण विसरले नाहीत. नेते, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी नाराज आहे. त्यामुळे औटी डेंजर झोन मध्ये गेले आहेत.कारण लंके यांनी पूर्वीपासूनच निवडणुकीची केलेली तयारी व त्यांचा घरोघर असलेला जनसंपर्क!

नेवाश्‍यात देखील चुरस वाढली आहे. विद्यमान भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या बाजूने नेत्यांची फळी उभी असली तरी जनमानसांमध्ये त्यांनी केलेल्या कोट्यवधीच्या विकास कामांबाबत शंका व्यक्‍त होत आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार शंकरराव गडाख यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या नियोजनामुळे आ. मुरकुटेंची कोंडी झाली आहे. त्याबरोबर गडाखांना माजी आमदार चंद्रशेखर घुलेंची ताकद मिळाल्याने गडाखांचे शक्‍यता वाढली आहे. मतविभागणीचा प्रश्‍न न राहिल्याने आ. मुरकुटेंचा मार्ग अडथळ्याचा बनला आहे.

राहुरीमध्ये विद्यमान भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे एकहाती बाजी मारणार असे वाटत असतांना स्वपक्षाकडून अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा फटका बसतो का अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यात राहुरीत यंदा मतविभागणीला संधी नाही. राष्ट्रवादीचे प्राजक्‍त तनपुरे व आ. कर्डिले अशी सरळ लढत होत आहे. त्या आ. कर्डिलेंचा हक्‍काच्या नगर तालुक्‍यात देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. अर्थात आ. कर्डिले पैलवान असल्याने ते त्यातून सुटका करण्यात ते माहिर आहेत. शेवगाव-पाथर्डीमध्ये चुरस वाढली आहे. जातीचे राजकारण होत असल्याने विद्यमान भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी सातत्याने भाषणात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा धावा सुरु केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात एकतर्फी निवडणूक होत नाही हे दिसत आहे.

कोपरगावमध्ये पारंपारिक काळे व कोल्हे अशी सरळ लढत होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. विखेंचे मेव्हणे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे व नगराध्यक्ष विजय वहाडणे हे अपक्ष म्हणून रिंगणात असले तरी खरी लढत भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे व राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्यात आहे. या मतदारसंघात देखील विखे फिरकले नाही. लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण व शिर्डीत विखेंची यंत्रणा राबली. पण या विधानसभेत ही यंत्रणा कोठे गायब झाली हे कळत नाही. विखेंची यंत्रणा प्रत्येक मतदारसंघात आहे पण ही यंत्रणा कोणाच्या बाजूने प्रचारात सक्रिय दिसत नाही. विखे सध्या संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी हे तीन मतदारासंघ सोडले तर अन्य एकही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला गेले नाही. खासदार डॉ. सुजय विखे यांनी अकोले, कोपरगाव, नगर शहर, नेवासे, पारनेर, श्रीरामपूर वगळता अन्य मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या आहेत. सध्या तरी मंत्रीपदाचे दावेदार ठरणाऱ्यांच्या मतदारसंघात पाडापाडीचे राजकारण सुरू झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.