ना. शिंदेंच्या विजयासाठी ‘होममिनिस्टरां’नी लावली फिल्डिंग 

जामखेड – माणूस कितीही मोठा झाला तरी अर्धांगिनी सोबतचा त्यांचा प्रवास हा सुख दुःखांची जुनी आठवण सांगणारा अन्‌ नव्याने साक्ष घेणारा असतो. याला निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवारही अपवाद नसतात. उमेदवार रिंगणात उभे असतात खरे पण त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या असणाऱ्या त्यांच्या पत्नी यांच्या सकाळच्या पेपर वाचण्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा दैनंदिन आराखडा कसा तयार करतात याची सगळ्यांनाच उत्सुकता असते.

अशाच कर्जत-जामखेड मतदार संघातील भाजपचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांच्या होममिनिस्टर आशाताई यांनी कर्जत-जामखेड तालुका पिंजून काढत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे.
पूर्वीच्या काळात स्त्रीला चूल आणि मूल या पलिकडे जाता येत नव्हते. मात्र महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करण्यास सुविधा मिळत आहे. त्यामुळे आजची महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. यशस्वी पुरुषांच्या मागे स्त्रीचा हात असतो, ही गोष्ट सर्वश्रृत आहे.

आज मात्र निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अनेक महिला आपले पती निवडणूक जिंकावे, याकरिता घरचे काम आटोपून पतीच्या प्रचाराची धुरा पतीच्या खांद्याला खांदा लावून सांभाळत आहेत. महायुती उमेदवार प्रा. शिंदे यांच्या अर्धांगीनी आशाताई राम शिंदे या घरची कौटुंबिक जबाबदारी पार पाडीत पतीला निवडणुकीत विजयी व्हावे. यासाठी महिला कार्यकर्त्यांना घेऊन गावागावात पदयात्रा काढून पतीच्या प्रचारात सिंहाचा वाटा उचलत आहेत.

प्रत्येक उमेदवाराची अर्धांगीनी पतीच्या सामाजिक व राजकीय कार्याची महती सांगून विकास कामाचा जागर करीत आपल्या पतीला निवडून देण्याकरिता मताचा जोगवा मागत पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करीत आहे. तथा या उमेदवाराच्या कुटुंबियांचे सदस्य प्रचारामध्ये सहभाग घेऊन कार्यकर्त्यांशी समन्वय साधून प्रचार करीत आहे. पदयात्रा, जाहिराती, लोकांना भेटणं, घरोघरी जाणं यामुळे निश्‍चितच त्यांना विजय मिळेल. याशिवाय त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेले काम हे लोकांनी पाहिलेले आहे. त्या कामाची पावती ही त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निश्‍चितच त्यांना विजय मिळेल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. एक पत्नी म्हणून मला जे काही करता येईल ते मी निश्‍चित करत असते.असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.