दीपोत्सवाची सांगता झाली. आता तुळशी विवाहाचे आणि आपल्या घरातल्या उपवर मुला- मुलींच्या लग्नाचे वेध लागतील. मध्यंतरी माझ्या ओळखीतल्या एका मुलाचे लग्न मोडले. “परस्परांशी पुरेशी ओळख होण्यासाठी मुलाने थोडा वेळ वाढवून मागितला.’ केवळ या एका कारणामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी नकार कळवला होता. शिवाय मुलावरच वेगवेगळ्या पद्धतीने आरोप झाले हा गंभीर मुद्दा होताच.
अलिकडे लग्नाच्या मुद्द्यावर नवनव्या पद्धती रूढ होताना दिसत आहेत. पूर्वीच्या काळी असे नव्हते. वडिलधाऱ्यांनी पसंत केलेल्या, नातेवाईकांनी सुचविलेल्या मुलाशी अगर मुलीशी खाली मान घालून लग्न केले जात असे. शब्दशः खाली मान घालूनच वडिलधाऱ्यांची आज्ञा किंवा इच्छा शिरसावंद्य मानण्याची पद्धत होती. मधल्या काळात काही कुटुंबात अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी नियोजित वर, वधूकडून स्वतःही पुढाकार घेतला जाऊ लागला. आपल्या आवडीनिवडी, भविष्याची स्वप्ने, शिक्षण, करिअर आदी घटकांचा विचार विनिमय होऊ लागला. यातही काही कारणाने लग्न शेवटपर्यंत न टिकण्याचे आकडे दिसत असले तरी स्वतःच्या इच्छेने लग्न होण्याचे प्रमाण वाढले होते.
आता मात्र लग्नाच्या पद्धती आणखी बदलत आहेत. बिग बजेट सिनेमा व टीव्ही- मालिकांच्या कृपेने उदंड होत चाललेले अवास्तव आणि अवाढव्य खर्चाच्या भाराने वाकलेले लग्न सोहळे, त्यासाठी असणारे लग्नाळू मुला- मुलींचे फाजील हट्ट, दिखावा व त्यामागचा हेतू, करिअरच्या दृष्टीने भविष्यातील गरजा, स्वप्ने, परस्परांच्या आवडीनिवडी अशा वेगवेगळ्या घटकांना फार महत्त्व असल्याचे दिसून येते. परंतु, सर्वात जास्त गरजेच्या असणाऱ्या मुद्द्यावर मात्र फारसा विचार आजही केला जात नाही, ही आपल्या लग्न संस्थेची शोकांतिका म्हणावी लागेल. “लग्न करू इच्छिणाऱ्या मुलगा व मुलगी यांची परस्परांशी गरजेची असलेली पुरेशी ओळख, मैत्री आणि नंतर लग्नाच्या वेदीवरील पाऊल.’ ही अत्यंत आवश्यक बाब मात्र बरेच जण सोयीस्कररित्या बाजूला ठेवतात आणि चट मंगनी । पट ब्याह करून उरकून टाकतात. लग्न ही काही पटकन उरकून टाकण्याची गोष्ट नाही हेच अजून अनेकांना समजत नाही.
लग्न, कुटुंब या दोन्ही समाजाच्या निर्मितीस पूरक असणाऱ्या सामाजिक संस्था. तसेच या दोन्ही एकमेकांनाही तितक्याच संलग्न आहेत, परस्परांवर आधारित आहेत. म्हणून मग यांना सर्वार्थाने जपणे, वाढविणे माणसाला स्वतःच्या अस्तित्वासाठी अत्यंत गरजेचे आहे असे आपले समाजशास्त्र सांगते. दोन व्यक्तींचे लग्न झाल्यानंतर कुटुंब तयार होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या लग्नातून पुन्हा नव्या कुटुंबाची निर्मिती होते. ही एखाद्या कालचक्रासारखी सातत्याने घडत राहणारी क्रिया आहे. नातेसंबंध आणि समाजप्रिय असणाऱ्या माणसाला अविरतपणे या कालचक्रातून आपला जीवनप्रवास सुरू ठेवावा लागतो.
मग इतक्या महत्त्वाच्या असलेल्या बाबतीत आपण ‘गडबड गुंडा’ करून आपले वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्य अधिक गुंतागुंतीचे करणे कितपत योग्य ठरेल? पण आपण सर्रासपणे हे करत असतो. तसे तर आयुष्यभर सोबत राहूनही बऱ्याचदा आपल्या जोडीदाराला, कुटुंबातील इतर सदस्यांना आपण पूर्णपणे ओळखतोच असे नाही. परंतु, लग्नासारख्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यावर निदान संबंधित दोन व्यक्तींच्या बाबतीत अत्यंत गरजेच्या असणाऱ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा आणि एक ‘हेल्दी रिलेशन’ निर्माण करण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्न करायला हवेत.
पत्रिका, ग्रहयोग, कुलस्वामी, जात-पात-धर्म, गोत्र, देणं- घेणं, संपत्तीचा दिखावा आदी गोष्टींचा विचार करणे चूक की बरोबर हा मुद्दा इथे नाहीच. कारण ‘जर-तर’ वर अवलंबून असणाऱ्या या मुद्द्यांवर अडून बसण्यापेक्षा लग्नासाठी पुढे आलेल्या संबंधित मुला- मुलींच्या आवडीनिवडी, राहणीमान, शारीरिक तपासणी, वेगवेगळ्या विषयावरील मते, विचार आदी घटकांवर सविस्तर चर्चा होणे अत्यंत आवश्यक वाटते. याबाबतीत दोन्ही कुटुंबातील पालकांकडून पुढाकार घ्यायला हवा आणि आपल्या कुटुंबात नव्याने दाखल होणाऱ्या नव्या सदस्यांचे सर्वार्थाने स्वागत करायला हवे.
म्हणजे कसं? तर, आपल्या मुला-मुलींचे शिक्षण, त्यांच्या क्षमता, आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे वधू/वराची निवड करायला हवी. भावी वधूवरांना आपल्या कुटुंबात सामावून घेता येईल असे पूरक वातावरण तयार करायला हवे. यांचे विचार आपल्याशी व त्या परस्परांशी किती प्रमाणात जुळतात? वैवाहिक आयुष्य व इतर बाबतीत यांची काय मते आहेत? त्यांच्या भविष्यासाठी कुणी, काय तरतुदी करायच्या आहेत? नियोजित वर/वधू एकमेकांच्या कोणत्या गोष्टी समजून घेतील? आदी अनेक गोष्टींचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. हा वेळ किती असावा हे मात्र प्रत्येकाच्या कुवतीनुसार, आकलन क्षमतेनुसार ठरणार आहे. तरीसुद्धा कोणतीही घाई गडबड न करता, लग्नासारख्या अत्यंत महत्त्वाच्या नात्याचा सर्व बाजूंनी विचार होणे फार आवश्यक आहे. त्यासाठी परस्परांच्या मतांचा आदर करणेही तितकेच गरजेचे आहे.