नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी येथे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. त्या भेटीत भारत आणि बांगलादेशशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
त्या भेटीवेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांच्याबरोबरच पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. हसीना यांची भेट प्रेरणादायी असल्याची भावना नंतर प्रियांका यांनी ट्विटरवरून व्यक्त केली. हसीना भारताच्या चार दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत.
त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. त्याशिवाय, दोन्ही देशांमध्ये सात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारत आणि बांगलादेशमधील संबंध आणखी दृढ होण्याच्या दृष्टीने हसीना यांचा दौरा उपयुक्त ठरणार आहे.