नवी दिल्ली – अति महत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) महिला कमांडोंची पहिली तुकडी सज्ज केली आहे. त्या महिला कमांडो माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आदींच्या सुरक्षेसाठी लवकरच तैनात केल्या जातील.
सीआरपीएफने 32 महिला कमांडोंची तुकडी बनवली आहे. त्या कमांडो झेड प्लस दर्जाची सुरक्षा असणाऱ्या दिल्लीस्थित व्हीआयपींना सुरक्षा पुरवतील. त्या व्हीआयपींमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी, त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मनमोहन यांच्या पत्नी गुरशरण कौर यांचाही समावेश आहे.
महिला कमांडोंना प्रथम व्हीआयपींच्या निवासस्थानी तैनात केले जाईल. लवकरच काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांवेळी गरज भासल्यास व्हीआयपींबरोबर महिला कमांडोही असतील.
महिला कमांडोंना व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी दहा आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये शस्त्रास्त्रांशिवाय लढणे, झडती घेण्याबरोबरच खास शस्त्रास्त्रांच्या वापराचाही समावेश आहे. पुरूष कमांडोंप्रमाणेच महिला कमांडोही गरजेनुसार शस्त्रास्त्रे आणि इतर साधने जवळ बाळगतील.