मुंबई – अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्याच्या कामाबाबतचा प्रश्न लवकर सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.
अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम प्रलंबित असल्याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य डॉ.रणजित पाटील, शशिकांत शिंदे, विक्रम काळे व संजय दौंड यांनी सहभाग घेतला होता.
राज्यमंत्री भरणे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अकोला विमानतळाच्या विकासाकरिता आढावा बैठक दि. 7 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात आली. या बैठकीत अकोला विमानतळाच्या विकासाबाबत व विस्तारीकरणाबाबत व्यवहार्यता अभ्यास अहवाल करण्यास सुचविले होते. तसेच या कामाबाबत वेळोवेळी सूचना आलेल्या आहेत. हे काम मार्गी लागण्यासाठी केंद्र शासनासोबत लवकरच बैठक घेतली जाईल अशी माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.