नवी दिल्ली – महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी तेलंगणा राज्याचे नवे पक्षप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर विद्यमान पक्ष प्रभारी माणिकम टागोर यांना गोव्याच्या प्रभारीपदी हलविण्यात आले असल्याचे कॉंग्रेसच्या एका नेत्याने बुधवारी सांगितले आहे.
“कॉंग्रेस अध्यक्षांनी तात्काळ प्रभावाने माणिकराव ठाकरे यांची तेलंगणाचे पक्ष प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे,’ असे कॉंग्रेसचे संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
ठाकरे हे महाराष्ट्रातील पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी यापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही उपभोगले आहे. तर माणिकम टागोर हे गोव्याचे प्रभारी म्हणून दिनेश गुंडू राव यांची जागा घेतील, असे निवेदनात म्हटले आहे.