साकूर -संगमनेर तालुक्यातील मांडवे बु. येथे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच परिसरातील इतर गावांमधील व बाहेरील व्यक्तींना गावात येऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
करोना विषाणूचा फैलाव शहराबरोबर ग्रामीण भागातही होत आहे. मांडवे बु. गावात करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मांडवे बु. ग्रामस्थांनी मांडव्याकडे येणारे साकूर, मांडवे खु., शिंदोडी, कौठेमलकापूर, बिरेवाडी तसेच संगमनेर-पारनेर हे सर्व रस्ते दगड, लाकडे टाकून बंद केले आहेत. तसेच शेजारील गावांमधील व्यक्तींनाही गावात येण्यास बंदी घातली आहे. तसेच गावातील व्यक्तींनाही गावच्या बाहेर जाण्यास बंदी घातली आहे.
ग्रामस्तरावर सर्वत्र खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. तसेच घराबाहेर न जाणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, याबाबत जनजागृती करण्याचे काम सरपंच शीला कुदनर, भाऊसाहेब डोलनर, तुषार धूळगंड, संतोष कुटे, बंडू सय्यद, अनिल डोमाळे, गुलाब बिडकर, अलिम शेख, किरण कुटे, शुभम कोळेकर, नितीन भोसले, रईस आतार आदी करत आहेत.