पुणे – अयोध्या येथील श्रीराम मंदिर, उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर, नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर, स्वामी मंदिर अशा देशातील वैविध्यपूर्ण मंदिरांच्या प्रतिकृतींची मांदियाळी यंदा पुण्यात गणेशोत्सव काळात होणार आहे. शहरातील विविध गणेश मंडळांतर्फे या मंदिरांची सजावट करण्यात येत असून, हे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे.
- मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ : यंदा उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचे गर्भगृह प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.
- शनिपार मंडळ ट्रस्ट : नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. मूळ मंदिरानुसार देखाव्याचा आराखडा मिथिलेश कुमार यांनी केला असून तीन महिन्यांपासून काम सुरू आहे. 60 फूट लांब, 40 फूट रुंद आणि 35 फूट उंचीच्या या देखाव्यामध्ये मंदिराचे गर्भगृह साकारण्यात येत आहे. येथील शिवलिंग पंचमुखी असून पाचही मुखांचे वेगळे महत्त्व आहे. पशुपतीनाथ भगवंताची मूर्ती असून, मंडपामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
- छत्रपती राजाराम मंडळ : शेगाव येथील गजानन महाराज मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. 100 फूट लांब, 56 फूट रूंद आणि 80 फूट लांबी असलेला हा देखावा तीन मजली असेल. गजानन महाराजांची मूर्ती आणि त्यावरच्या मजल्यावर गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यती श्री माधवानंद तीर्थ यांच्या हस्ते शुक्रवारी या मंदिराच्या प्रतिकृतीवर कलशारोहण समारंभ करण्यात आला.
- श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्ट : यंदा मंडळाचे शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त जगन्नाथ पुरी येथील मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे.
- साने गुरुजी मंडळ : उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे.
- हुतात्मा बाबू गेनू मंडळ : चारधाम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे.
- अखिल मंडई मंडळ : यांच्यातर्फे यंदा स्वामी मंदिराराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे.