अगं सध्या काय चाललंय तुझं?’ मी मीनलला विचारले. सकाळीच बाईसाहेबांचा फोन आला होता. “काही नाही गं, सध्या गाणं शिकतेय ऑनलाइन, आमच्या मॅडम सध्या ऑनलाइन क्लासेस घेतात ना. मीनल म्हणाली. मीनलला पूर्वीपासून गाणे शिकायचे होते, पण तेव्हा जमले नाही म्हणून आता ती आपली हौस पूर्ण करून घेत होती.
पूर्वी कोणतीही गोष्ट शिकायची म्हणजे त्या शिक्षकाकडे जावे लागत असे. पण आता ऑनलाइन शिक्षणाचे एक नवेच पर्व सुरू झाले आणि आज माझी मैत्रीण त्याबद्दलच सांगत होती. “अरे! वाह! मस्तच.’ मी म्हणाले. “माणसाने सारखे काहीतरी नवे शिकत राहिले पाहिजे. हो. ना, माझीही खूप दिवसांची इच्छा पूर्ण होतेय.’ इति मीनल. “तुझं काय चाललंय सध्या?’ “माझं पण नवीन शिक्षण’ मी हसतच म्हणाले. “स्टॉक मार्केट शिकतेय सध्या.’ “हो! का? कोणाकडे गं? कोण गुरू?’ “अगं युट्यूब माझा गुरू’, मी मिश्किलपणे म्हणाले.
सध्या ऑनलाइन शिक्षणाचे जे नवे दालन उघडले त्यात एक म्हणजे तुमचा शिक्षक ठराविक वेळेला ऑनलाइन शिकवतोय आणि तुम्ही त्याचवेळी ऑनलाइन शिकताय तर दुसरा म्हणजे एखाद्या शिक्षकाने त्याच्या सोयीनुसार एक व्हिडिओ ऑनलाइन टाकला आहे आणि तुम्ही तुमच्या सवडीने तो बघून शिकताय. युट्यूब दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतं. युट्यूब वर अनेक जण वेगवेगळे कंटेंट टाकत असतात. त्यातील काही एजुकेशनल असतात, काही मनोरंजनात्मक असतात, काही बातम्या आणि पोलिटीकल चर्चांचे असतात.
अर्थात यापेक्षाही खूप वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट युट्यूब वर बघायला मिळतात. अनेक चानेल मधून विविध माहिती मिळून आपल्या ज्ञानात भर पडते. आता हेच बघा ना, काही वर्षांपूर्वीपर्यंत स्टॉक मार्केट आणि माझा दूर दूरचा पण संबंध नव्हता. पण हळूहळू ऑनलाइन शिकत गेले तशी गोडी वाटू लागली. इतके वर्ष आपण हे का शिकलो नाही याचे आश्चर्य वाटून गेले. रचना रानडे आणि असे असंख्य ऑनलाइन गुरू मिळाल्यावर शिकायला सोपे वाटू लागले.
काही वर्षांपूर्वी शेअर मार्केट मधलं माझं ज्ञान अजिबात शेअर करण्यासारखं नव्हत. पण परवा तर चक्क माझ्या चुलत भावाला स्प्लिट शेअर आणि बोनस शेअर याच्यातला फरक सांगितला तर तो बेशुद्धच पडायचा शिल्लक होता.
पूर्वी स्वयंपाकाच्या हमखास टिप्स मिळणारे ठिकाण म्हणजे आई आणि सासू. तिळगुळाचे लाडू सारख्या वर्षातून एकदाच बनवायच्या पदार्थांचे प्रमाण विचारायला तर याच दोघी हक्काच्या. पण त्यांच्या वयोमानानुसार या दोघी काही सदासर्वकाळ पुरणार नाहीत याची जाणीव होती. अशावेळी मधुरा, सरिता,कविता या युट्यूब वरच्या गुरुमाता मदतीला आल्या.
अगदी प्रमाणासह वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर बघता आले त्यामुळे त्यांच्या चानेल वरून अनेक पदार्थ शिकता आले. मोठ मोठ्या शेफ्सचेही युट्यूब चानेल असतात. ते बघून तर जगभरच्या पाककृती शिकता येतात.अर्थात मी काही फार हाय फाय पदार्थ करण्याच्या फंदात पडत नाही पण अनेक जण या फाईव स्टार शेफचे पदार्थ हुबेहूब बनवतात. एका सणाला मैत्रिणीकडे गेले होते. दाराबाहेर सुंदर रांगोळी होती. युट्यूब चानेल वरून शिकली ती. बांगड्या, ताटल्या असा काय काय वापरून झटपट काढली म्हणाली. अतिशय आकर्षक रांगोळी दिसत होती ती. पारंपारिक रांगोळी, संस्कार भारती रांगोळी अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या युट्यूब चानेल वर शिकायला मिळतात.
मागच्या महिन्यात युट्यूब वर एरोबिक्स चा क्लास लावला. या गुरूंनी चारच दिवसात माझा पिट्ट्या पाडला. हात पाय इतके दुखले की युट्यूब उघडूसुद्धा शकले नाही. मग हे थांबवले आणि योगा चानेल बघायला लागले. योगासने पूर्वीपासून येत होती त्यामुळे या गुरूंनी दिलेले ज्ञान रिफ्रेशिंग कोर्स सारखे वाटले. योगासने करताना आनंद मिळू लागला आणि या गुरुना मी मनोमन धन्यवाद दिले. त्यानंतर डाएट गुरूंकडे वळणार होते, पण याच्या पुर्वानुभावामुळे मी या फंदात न पडण्याचे ठरवले. खरंच युट्यूबमुळे किती ज्ञान आपण घरबसल्या मिळवू शकतो नाही? अगदी साड्यांपासून ड्रेस शिवा किंवा भरत काम शिका युट्युब गुरू सर्वत्र हजर आहेत. बस तुम्ही फक्त नाव काढा त्या प्रकारचा कंटेंट लगेच तुम्हाला मिळून जाईल.
मला घरात छोटी रोपं लावायला खूप आवडतात, पण जास्त ऊन येत नसल्यामुळे झाड जगत नव्हती. मग युट्यूब चानेल्स पहिली आणि कमी उन्हात जगणारी झाडे कोणती, भरपूर उन्हाची गरज असलेली झाडे कोणती ते कळले. त्याप्रमाणे रोपं आणली. माती, खत घालून छान पैकी कुंड्या तयार केल्या. आता त्यात लावलेली झाड हिरव्यागार पानांनी डवरली आहेत. खरच घरबसल्या मिळालेल्या या ज्ञानामुळे माझी झाडे लावण्याची हौस पुरी झाली.
नवीन आलेले तंत्रज्ञान चॅटजीपीटीची पहिली ओळख इथेच झाली आणि युट्यूब गुरूंनी दाखवल्याप्रमाणे ते वापरूनसुद्धा पहिले. युट्यूब वर अनेक संगणकीय भाषांसाठी कोडींग शिकवले जाते. पण असे टेक्निकल शिकण्यासाठी तुम्हाला एकलव्य होणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला फारसे काही जमणार नाही. इन्टिरिअर डिझायनेरचा एक उत्तम चानेल बघण्यात आला. त्याविषयाचे शिक्षण घेणाऱ्या माझ्या भाच्याला तो मी लगेच रिफर केला. नुसते पुस्तकात वाचण्यापेक्षा आपल्या डोळ्यांनी समोर बघितले म्हणजे खूप छान समजते. त्यालाही तो चानेल खूप आवडला. टीव्ही रीपेयरिंग, मोबाइल रीपेयरिंग अशा अनेक टेक्निकल गोष्टींचे ट्रेनिंग तुम्हाला युट्यूब वर मिळते. अर्थात हे ज्ञान बेसिक लेवलचे असते पण या विषयांची तोंड ओळख होण्यासाठी पुरेसे असते. तुम्हाला जे काही शिकायचे आहे त्यातला योग्य गुरू तुम्हाला शोधता आला पाहिजे अन्यथा भारंभार चानेल्सची इथे कमी नाही. युट्यूब चानेल्सची सर्व विषयात मुशाफिरी आहे आणि त्यांनी माझे अनेक विषयांचे ज्ञान वाढवले आहे.
– अस्मिता भिडे