पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड शहरातील नवरात्रोत्स मंडळांचे मंडप शुल्क माफ करण्याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी आदेश काढले आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांनी याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती. त्याला यश मिळाले आहे.
नवरात्रोत्सव हा उत्साहाचा सण आहे. या उत्सवानिमित्त शहरात उभारण्यात येत असलेल्या पत्राशेड, मंडपाचे भाडे महापालिका प्रशासनाकडून वसूल केले जाते. मात्र, गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवातही मंडप भाडे माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने केली होती. त्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
शेखर काटे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. या वेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेविका माया बारणे, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, पदाधिकारी रोहित काटे उपस्थित होते. त्या वेळी आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते.
गणेशोत्सवात शासनाकडून देखील सहकार्य करत काही गोष्टींमध्ये सवलत देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सवात शासनाकडून सहकार्य मिळावे, अशी शहरातील मंडळांची अपेक्षा होती. उत्सवानिमित्त शहरात उभारण्यात येत असलेल्या पत्राशेड, मंडपाचे भाडे महापालिका प्रशासनाकडून वसूल केले जाते. मात्र, गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवातही मंडप भाडे रद्द करण्यात आले आहे. याबद्दल महापालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करतो, असेही शेखर काटे यांनी म्हटले आहे.