कोलकाता – तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी अभिषेक बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या कोलकाता येथे झालेल्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खासदार असलेले अभिषेक बॅनर्जी हे पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत.
त्यांच्याविषयी मध्यंतरी तृणमूलमध्ये वाद सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पक्षात त्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याच्या काही जणांच्या तक्रारी होत्या. पण आता त्यांना पक्षात महत्त्वाचे पद अधिकृतपणे देण्यात आल्याने त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे.
यावेळी पक्षाच्या अन्यही काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तृणमूल कॉंग्रेसच्या महिला विभागाच्या प्रमुखपदी खासदार काकोली घोष यांची, तर युवक तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अभिनेते सायोनी घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत पक्षाच्या युवक शाखेच्या प्रमुख पदाची जबाबदारी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर होती. एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार त्यांनी हे पद सोडले आहे. तृणमूल कॉंग्रेसला बंगाल बाहेरही वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे या नियुक्तीनंतर बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले.