ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ !आणखी एका मंत्र्यानी दिला आपल्या पदाचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात सुरु असणारे राजीनामा सत्र काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण आता ममता बॅनर्जी सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. राजीव बॅनर्जी यांनी आपला राजीनामा थेट राज्यपालांकडे पाठवला असून, राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजीव बॅनर्जी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

राजीव बॅनर्जी भारतीय जनता पक्षात (भाजप) सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजीव बॅनर्जी नाराज होते. मंत्रिमंडळाच्या तीन बैठकीतही राजीव बॅनर्जी यांनी गैरहजर राहिले होते. यानंतर ते राजीनामा देतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पश्चिम बंगालच्या जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळाले. हा माझा सन्मान आहे. ही संधी मला मिळाली, त्याबाबत मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो, असे राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.

राजीव बॅनर्जी बऱ्याच काळापासून पक्षात नाराज होते. राजीव बॅनर्जी यांची नाराजी दूर करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी त्यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या होत्या. मात्र, त्यातून कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेरीस राजीव बॅनर्जी यांनी राजीनामा दिला, असे सांगितले जात आहे.

पुढील आठवड्यात अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचवेळी राजीव बॅनर्जी हेदेखील भाजप प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच राजीव बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ हावडासह राज्यातील इतर भागात पोस्टरबाजी सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.