करोनाचे संकट कायम! गावजत्रांवर यंदाही अनिश्‍चिततेचे सावट

गावकरी, देवस्थानांकडून साध्या पद्धतीने उत्सव साजरे

पिंपरी – पौष महिना सुरू झाल्यानंतर आता ग्रामीण भागातील गावजत्रांना सुरुवात झाली आहे. मात्र, करोनाचे संकट अजूनही घोंघावत असल्याने गावजात्रा भरण्यावरच अनिश्‍चिततेचे सावट निर्माण झाले आहे. निगडीतील खंडोबा देवस्थानच्या वतीने यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा केल्याने, गावजत्रांमध्ये केवळ ग्रामदेवतेची पूजा करून साध्या पद्धतीने गावजत्रा साजरा करण्याचे संकेत मिळत आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावाने गेली वर्षभरापासून प्रत्येक क्षेत्राला ग्रासले आहे. भारतात करोनाची दुसरी लाट न आल्याने, केंद्र सरकारपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे. बहुतांशी व्यवहार सुरळीत झाले आहेत. मात्र, धार्मिक स्थळांमधील भाविकांच्या उपस्थितीवर मर्यादा आल्या आहेत. भजन, कीर्तनाचे कार्यक्रमही मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पार पाडले जाऊ लागले आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देश लॉकडाऊन करण्यात आला. तोपर्यंत ग्रामीण भागातील अनेक गावच्या जत्रा पार पडल्या होत्या. मात्र, खऱ्या अर्थाने मे महिन्यात गावजत्रांचा आनंद नागरिकांना पै-पाहुण्यांसोबत घेता आला नाही. सद्यःस्थितीत गावजत्रांचे वेध लागले आहेत.

तर करोनाला रोखण्यासाठी देशपातळीवर लसीकरण सुरू आहे. आजही काही प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडत असल्याने, करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांना लग्नसराई, चित्रपटगृहे, धार्मिक स्थळे याठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

गेल्यावर्षी काही गावांना यात्रा साजऱ्या करता आल्या; तर काही गावांना करोनामुळे त्यावर पाणी सोडावे लागले. तर अनेक ठिकाणच्या धार्मिक स्थळांच्या वतीने साजरे केले जाणारे उत्सव रद्द करण्यात आल्याने गावजत्रादेखील साध्या पद्धतीने साजऱ्या करण्याचे संकेत मानले जात आहेत. त्यादृष्टीने गावकऱ्यांचीदेखील मानसिकता असल्याचे समजते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.