तिरुवनंतपुरम – “इस्रो’च्या तांत्रिक कर्मचारीपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये दोन व्यक्तींनी केलेल्या फसवणुकीचा सविस्तर तपास करण्याला केरण पोलिसांनी सुरुवात केली आहे. फसवणूकीचा आरोप असलेले दोघेही जण हरियाणातील आहेत. विक्रम साराभाई अवकाश केंद्रातील कर्मचारी पदासाठी झालेल्या परीक्षेमध्ये फसवणूक केल्याचा आरोप या दोघांवर आहे.
या परीक्षेसाठी एकट्या हरियाणा राज्यातून 400 उमेदवारांनी भाग घेतला होता. या परीक्षेतील फसवणुकीच्या प्रकारामध्ये कोचिंग क्लास देखील सहभागी असावेत, असा संशय आहे. हरियाणा येथे तपास करण्यासाठी केरळ पोलिसांचे पथक हरियाणाला पाठवण्यात येणार असून हरियाणा पोलिसांनाही तपासात सहभागी करून घेतले जाणार आहे.
परीक्षा सुरू असताना फसवणूक करताना दोन जणांना “रंगे हात’ पकडले गेले होते. ही परीक्षा देण्यासाठी हरियाणावरून आलेल्या चौघांसह या दोघांनाही सध्या पोलीस कोठडीमध्ये टाकण्यात आले आहे. परीणेच्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल आणले असून फसवणुक केली जाणार असल्याची माहिती निनावी फोनवरून मिळाल्यानंतर पोलिसांनी परीक्षार्थींची तपासणी केली होती. परीक्षेतील फसवणुकीमुळे ही परीक्षाच रद्द करण्यात यावी, अशी विनंती विक्रम साराभाई अवकाश केंद्राला केली आहे.