साहेबराव साळुंखे; म. गांधी वाचनालयाचा सुवर्णमहोत्सव
मेढा (प्रतिनिधी) – बौद्धिक विकासासाठी सातत्याने सकस वाचन केले पाहिजे. आजचे युग संगणक, मोबाइलचे असून तरुण पिढी त्यात अडकून पडली आहे. त्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. पालकांनी वाचनाची सवय लावून घेतली तर मुले त्यांचे अनुकरण करतील, असे प्रतिपादन साहेबराव साळुंखे यांनी केले.
येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विजयाताई थत्ते सभागृहात वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच कृतज्ञता सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे माजी संचालक, माजी कर्मचारी व देणगीदारांचा छबन गांधी, मुरलीधर काशीळकार, बाळकृष्ण पंडित, मारुतीराव देशमुख, एम. डी. जाधव, विलासराव पवार, यशवंतराव कदम, सर्जेराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी सरपंच नारायण शिंगटे, सोमनाथ काशीळकर, सूर्यकांत देशमुख उपस्थित होते. संचालक शामराव क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले.कार्याध्यक्ष शोभा शेडगे यांनी आभार मानले. सचिव धनंजय पवार व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.