सीमा सुरक्षा दलाच्यावतीने मानवंदना
धकटवाडीत लोटला जनसागर
खटाव (प्रतिनिधी) – जम्मू-कश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना निधन झालेले धकटवाडी (ता. खटाव) येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव (वय 24) यांच्यावर धकटवाडी येथे आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सीमा सुरक्षा दलाचे जवान, पोलीस दलातील अधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या अंत्ययात्रेत संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे या छोट्या गावात जनसागर लोटला होता.
ज्ञानेश्वर जाधव यांचा विवाह झाला होता. आई-वडिलांना ते एकुलते एक होते. त्यांना दोन महिन्यांचा चिमुकला मुलगाही आहे. आ. महेश शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे, नायब तहसीलदार कमलाकर भादुले, सपोनि अशोक पाटील, गटविकास अधिकारी रमेश काळे, नरेंद्र मेडेवार, चंद्रकांत पवार, सुभेदार भगवान राव, कॅप्टन बंडू कोकरे, कॅप्टन बबनराव घाडगे, कॅप्टन सदाशिव शिंदे, माजी आमदार दिलीप येळगावकर, रणजित देशमुख, अशोक गोडसे, भरत जाधव, डॉ. विवेक देशमुख, हनुमंतराव देशमुख, राहुल
पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, ओंकार महाराज, पोपटराव पाटील, विविध गावचे सरपंच, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी जवान जाधव यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
जवान ज्ञानेश्वर जाधव यांच्या आकस्मिक निधनाने फक्त त्यांच्या कुटुंबियांवरच नव्हे तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांना आम्ही आधार देऊ.
– कृष्णाजी रंगू माने, सरपंच, धकटवाडी