श्रीनगर – मोठ्या विरोधी पक्षांनी प्रथम एकत्र येऊन लहान प्रादेशिक पक्षांना मार्ग दाखवावा, अशी नवी भूमिका जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी मांडली. त्यामुळे विरोधकांच्या देश पातळीवरील आघाडीविषयी ते अद्यापही प्रतिकूल असल्याचे सूचित होत आहे.
उमर यांनी काही दिवसांपूर्वीच संभाव्य आघाडीविषयी ते फारसे अनुकूल नसल्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला पाटण्यात होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उमर यांचीही भूमिका बदलेल असे वाटत होते.
पण, त्यांनी मंगळवारी पुन्हा संभाव्य आघाडीविषयी काहीशी प्रतिकूल टिप्पणी केली. अनेकदा 50, 100 किंवा 200 जागांचे संख्याबळ असणाऱ्या पक्षांत ऐक्य घडताना दिसत नाही. मात्र, छोट्या पक्षांकडून तशी अपेक्षा केली जाते.
आमच्या सारख्या छोट्या पक्षांची भूमिका अतिशय मर्यादित आहे, असे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते असणारे उमर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे अब्दुल्ला पिता-पुत्रांमध्ये संभाव्य आघाडीत सहभागी होण्याविषयी मतभिन्नता असल्याचे मानले जाऊ लागले आहे.