प्रेमात झाला मजनू; तिच्या घराबाहेर म्हणू लागला गाणी

पुणे – एकतर्फी प्रेमात मजनू झालेल्या तरुणाने तरुणीच्या घराबाहेर फिल्मी गाणी म्हणत राडा घातला. ही घटना मीठगंज पोलिस चौकीजवळ घडली. राडा घालणाऱ्या तरुणाला तक्रारीनंतर खडक पोलिसांनी अटक केली आहे.

शोहेब समीर तांबोळी (21, रा.खडक) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका वीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शोहेब तांबोळी कोणतेही कामधंदे करत नाही. तो फिर्यादी तरुणी क्‍लासला जाताना नेहमी तिचा पाठलाग करत होता. तिला रस्त्यात अडवून लग्नाची मागणी घालत होता. तिने त्याला कोणताच प्रतिसाद न दिल्यावर चिडलेल्या शोहेबने तरुणीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीलाही फिर्यादीने भिक घातली नाही.

यामुळे तिच्या प्रेमात वेडा झालेल्या शोहेबने बुधवारी रात्री तडक तिचे घर गाठले. तिथे त्याने चित्रपटातील प्रेमगीत गात तरुणीला साद घातली. मात्र त्याला कोणताच प्रतिसाद मिळला नाही. यामुळे तो आणखीनच बिथरला. गाणी म्हणता म्हणाता तो अश्‍लिल इशारेही करु लागला. त्याच्या अश्‍लिल इशाऱ्यांमुळे फिर्यादी व आजूबाजूंच्या महिलांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. यामुळे फिर्यादीने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच त्याला खडक पोलिसांनी अटक केली. याप्रकरणाचा तपास महिला सहायक पोलिस उपनिरीक्षक आजेवागकर करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.