इटस्‌ सो सिंपल टू बी हॅपी…

हृपिकेश मुखर्जी यांचा बावर्ची हा चित्रपट 1972 मध्ये आला. तेव्हा ऍक्‍शनपटांची तेवढी भरमार नव्हती. मात्र आजच्या सारखी चित्रपटाची जातकुळी कुठलीही असली तरी हिंसाचार, रक्तपात, सगळीकडे काळोख दाटलेला, एका भकास वातावरणाने संपूर्ण पडदा व्यापलेला असला प्रकार नव्हता. नाही म्हणायला काही ऍक्‍शनपट आणि ऍक्‍शनपटू तेव्हाही कार्यरत होते. मात्र औषधापुरते.

चित्रपटांचा फोकस असायचा तो सामाजिक विषयांवर. त्यात नाती, कुटुंबसंस्था, मालक- कामगार, श्रीमंत- गरीब मुलामुलीचे प्रेम, असला प्रवास असायचा. थोडक्‍यात ड्रामा असायचा. पल्लेदार संवाद असायचे. गुळगुळीत चेहऱ्याचा नायक आणि भरपूर वस्त्रालंकारांनी ल्यायलेली नायिकाही असायची. तिची चित्रपटातील कौटुंबिक पार्श्‍वभूमी काहीही असो ती पडद्यावर श्रीमंतच दिसायची.

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा तो काळ होता. अर्थात राजेश खन्नाही कदाचित तेच ते काम करून वैतागले असतील किंवा असावेत. एक लव्ह स्टोरी, चार दोन हिट गाणी, चांगली कथा पण येउन जाउन तेथेच घुटमळणे हा तो कालखंड.

हृषिदांची यावर नजर गेली नसती व त्यात काही बदल करावासा त्यांना वाटला नसता तरच नवल होते. त्यांनी सुपरस्टारलाच बावर्ची म्हणून सादर केले. राजेश खन्ना यांच्यासारखा लोकप्रियतेच्या बाबतीत सगळ्यांत श्रीमंत स्टार अन चक्क बावर्ची अर्थात स्वयंपाकी अथवा आचारी? कल्पना करण्याचेही कोणी धाडस केले नसते. हृषिदांनी ते केले.

सुपरस्टारने त्यांच्या अर्थात हृषिदांच्या पात्रतेवर, श्रेष्ठतेवर विश्‍वास ठेवला. तपन सिन्हा यांची कथा आणि खुद्द मुखर्जी यांचे दिग्दर्शन, राजेश खन्ना यांची अप्रतिम अदाकारी, सोबत जया भादुरी, ए के हंगल, दुर्गा खोटे, असरानी असे कसलेले कलाकार. ही भट्टी वेगळीच जमली.

शर्मा नावाचे कुटुंब. वृध्द पिता आणि त्याची दोन मुले, सुना, नातवंडे. एक मुलगा अकालीच गेलेला. त्याच्या मुलीवर वृध्दाचा जिव. मात्र काकामंडळी जरी तिला चांगली वागणूक देत असली तरी बडी मॉं आणि छोटी मॉंच्या मनात तिच्याबद्दल किंचित अढी. ती मुलगी गुणी. मात्र तिला आपली स्वप्ने पाहण्याचेही धाडस नाही. परिस्थितीने अचानक सगळ्यांनाच लावलेला फुलस्टॉप.

बरे या कुटुंबात वरून सगळे एकिकरण असले तरी आता मात्र कुटुंब दुभंगलेले. घराच्या बाहेरची भिंत एकसंध असली तर आत पार्टीशन झालेले. जो तो मी आणि माझे, माझा एवढाच विचार करणारे. घरातल्या एका टाळता न येणाऱ्या कोपऱ्यातून घसरून रोज पडणारे या कुटुंबातील सदस्य किमान त्या कोपऱ्याची तरी काळजी घेत तेथे स्वच्छता करतील. पण त्यातही त्यांना स्वारस्य नाही.

कुटुंबप्रमुख दादूजी (हरिंद्रनाथ चटोपाध्याय) यांच्या मुळीच शांतता नसलेल्या या शांती निवासमधील कुटुंबात रघुचा अर्थात राजेश खन्ना यांचा प्रवेश होतो. कसा होतो, माहित नाही. कोणी बोलावले असते तेही माहित नाही. मात्र गरज असते आणि रघु तेथे बावर्ची म्हणून चिकटतो.

नावालाच बावर्ची. तो पाहता पाहता संपूर्ण घराचा, घरातल्या सदस्यांच्या मनाचा, त्यांच्या गरजांचा ताबा घेतो. इतके की त्या घरात ” हर मर्ज का एकही इलाज ” म्हणजे रघु. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांशी त्याचे त्या त्या सदस्यांच्या योग्यतेनुसार तार जुळलेले. मात्र रघुची एक चकित करणारी गोष्ट असते. ती नंतर उलगडते.

कृष्णाबद्दल (जया भादुरी) त्याच्या मनात विशेष स्नेह. आपल्याला भक्‍कम पाठिंबा देणारा कोणी नसल्यामुळे कृष्णा कुठेतरी आपल्याच कोषात राहणारी, स्वत:च्याच गुणांची जाणीव असून त्याकडे दुर्लक्ष करणारी. तिच्या आयुष्यातही प्रेमाचा सुगंध दरवळतो. मात्र पुढे काय वाढून ठेवले याची तिलाही कल्पना असते. ती डमगगते…

दादूजींच्या मते इश्‍वरानेच रघुला त्यांच्या शांती निवासमध्ये पाठवले असते. सगळ्यांच्या प्रेमात पडलेला आणि सगळ्यांना आपला प्रेमात गुरफटून टाकणारा रघु एक दिवस अचानक गायब होतो. त्याचसोबत दादूजींच्या घरात असलेली दागिन्यांची पेटीही…

नंतर काय होते, कसे होते, का होते या सगळ्याचा उलगडा चित्रपटात केला आहे. मुळात रघु कोण असतो तो इतका सर्वगुण संपन्न असूनही बावर्चीचे काम का करतो याचेही स्पष्टीकरण चित्रपटात देण्यात आले आहे.

गुलजार यांचे संवाद आहेत. हा चित्रपट हसवतो. मनोरंजन करतो मात्र त्याचवेळी अंतर्मुखही करतो. शर्मा यांच्या कुटुंबाप्रमाणे आपलेही कुटुंब दुभंगण्याच्या मार्गावर नाही ना, असा प्रश्‍न स्वत:ला विचारण्यास प्रवृत्त करतो. रघुसारखी मंडळी जगात खरेच असतील. शंकाच नाही. तसे जर नसते, तर जग अजुनही इतके सुंदर राहु शकलेच नसते.

हृषिदांनी कदाचित बॉक्‍स ऑफिसचे ठोकताळे डोळ्यासमोर अथवा डोक्‍यात ठेवून चित्रपट कधीच केले नसतील. किंवा केलेही असतील. मात्र त्यांच्या कलाकृतीच्या दर्जाशी, तिच्या उच्च गुणवत्तेशी आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या संदेशाशी कधीच तडजोड केली नाही.

बावर्चीत एक संवाद रघुच्या ओठी आहे….

इटस्‌ सो सिंपल टू बी हॅपी
बट सो डिफिकल्ट टू बी सिंपल
हे शब्द साधे आहेत. मात्र त्यांचा अर्थ फार मोठा आहे.

(क्रमश:)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.