नवी दिल्ली – अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्यात अटीतटीचा सामना सुरु आहे. अशातच ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.
“This is a fraud on the American public… we were getting ready to win the election, frankly we have won the election. Our goal now is to ensure integrity… We’ll be going to the US Supreme Court. We want all voting to stop,” says Donald Trump pic.twitter.com/eG2Q6DzedZ
— ANI (@ANI) November 4, 2020
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा बाजी मारणार की डेमोक्रेटचे जो बायडन जिंकणार याकडे अख्ख्या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली.
यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विजयाचा दावा केला असून जो बायडेन यांच्यावर मत चोरीचा आरोप केला आहे. पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
आम्ही दुसऱ्या अन्य राज्यात जिंकतोय हे जाहीर करणार होतो आणि तितक्यात हा घोटाळा झाला. ही अमेरिकन लोकांची फसवणूक आहे आणि आम्ही ही फसवणूक होऊ देणार नाही, असेदेखील ट्रम्प यांनी म्हंटले आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वीच टपाली मतदानावरून निवडणुकांचा निकाल मान्य न करता न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला होता. पेनसिल्वानियातील टपाली मतदान जर मतमोजणीनंतर तीन दिवसांनी मोजले जाणार असेल तर आपण न्यायालयात जाणार आहोत, असे ट्रम्प यांनी म्हंटले होते.
दरम्यान, जो बायडेन यांनी डेलावर या आपल्या गृहराज्यात विजय मिळवला आहे, त्याशिवाय वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, ओरेगनमध्ये बायडेन विजयी झाले आहेत. पण महत्त्वाच्या फ्लोरिडात ट्रम्प आघाडीवर आहेत.