मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटांचे सुपरस्टार बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार, ही चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रेक्षक ज्या स्टार्सला बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना पाहू इच्छितात त्यात महेश बाबूचा समावेश आहे. महेश बाबूचे फक्त दक्षिण भारतातच नाही तर उत्तर भारतातही खूप चाहते आहेत.
आपल्या आवडत्या स्टारने हिंदी चित्रपटात काम करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण महेश बाबूचे मत याच्या अगदी उलट आहे. महेश बाबूने बॉलीवूडबद्दल आपल मत मांडलं आहे. त्यांच्या या मतामुळे कदाचित हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या निर्मात्यांची झोप उडाली असेल. महेश बाबूने आपल्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल म्हटले आहे की, ‘बॉलीवूड मला परवडत नाही, त्यामुळे मी हिंदी चित्रपट करण्यात आपला वेळ वाया घालवू इच्छित नाही.’
सोमवारी आदिवी शेष स्टारर चित्रपट मेजरच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात महेश बाबू यांनी ही माहिती दिली. महेश बाबूच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली मेजर चित्रपटाची निर्मिती करण्यात आला. आदिवी स्टारर या चित्रपटात मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचा सैनिक बनण्याची आवड दाखवण्यात येणार आहे.
यावेळी बॉलीवूड पदार्पणाबद्दल बोलताना महेश बाबू म्हणाले की, मला बर्याच हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत, परंतु मला वाटत नाही की ते मला अफॉर्ड करू शकतील.
महेश बाबू म्हणाले,’मला परवडत नाही अशा उद्योगात काम करण्यात मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. मला इथे (दक्षिण) खूप आदर आणि स्टारडम मिळाले आहे, त्यामुळे मी माझी इंडस्ट्री सोडून दुसऱ्या इंडस्ट्रीत जाण्याचा कधीच विचार करत नाही. मी नेहमीच चित्रपट करायचा आणि मोठा व्हायचा विचार केला. आणि माझे स्वप्न पूर्ण झाले.’
महेश बाबूसोबत काम करण्याची प्रत्येक निर्मात्याची इच्छा असते. त्याचे कारण म्हणजे त्याची मनमोहक शैली, जी त्याच्या चाहत्यांना खूप आवडते. अशा परिस्थितीत, बॉलिवूड निर्मात्यांनाही महेश बाबूसोबत काम करण्याची इच्छा असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत, परंतु बॉलिवूड किंवा महेश बाबूकडून याबाबत कधीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. आता महेश बाबूच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, त्याला सध्या बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची कल्पना नाही.