लोणी काळभोर – येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांनो सावधान व्हा, घरात बसा. विनाकारण फिरणार असाल तर पाठ व पार्श्वभाग चांगलाच लाल होणार आहे… कारण लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांच्यावर आळा बसावा यासाठी, जिल्हा पोलीस दलातील एक स्पेशल कमांडोची तुकडी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
विनाकारण रस्त्यावर कोणीही दिसले तरी, कमांडो पथकाने रस्त्यावर येणाऱ्यांना पाठलाग करुन बडवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी (दि. 26) सायंकाळपासून सोमवारपर्यंत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हद्दीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 25हून अधिक जणांना स्पेशल कमांडो जवानांनी काठीचा मजबूत प्रसाद दिला आहे. कमांडोंकडून मजबूत चोप मिळत असल्याने, विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने पूर्व हवेलीमधील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन, कुंजीरवाडी व नायगाव ही सात गावे बफर झोन (करोना प्रतिबंधित क्षेत्र) असल्याचे जाहीर केले.
यानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी वारंवार कारवाई करुनही नागरिक ऐकत नसल्याने, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एक स्पेशल कमांडोची तुकडी लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीला दिली आहे.
सात गावांमध्ये होणार कारवाई
कमांडोच्या कारवाईमुळे तरी नागरिक विनाकारण रस्त्यावर येणार नाहीत, असा विश्वास लोणी काळभोर पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कमांडो कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन, कुंजीरवाडी व नायगाव या सातही गावात कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली.